Friday 1 June 2018

घर थकलेले सन्यासी



'घर पाहावे बांधून व लग्न पाहावे करून' असे उगीच नाही म्हटल्या जात, दोन्ही कामाचा अनुभव लक्षात राहील असाच असतो.  'मला घर बांधयाचे आहे' असे म्हणनारे अनेक जण अधुन मधून भेटत असतात.

'खेड्यामधले घर कौलारू' असे आता म्हणता येणार नाही.  त्याचेही स्वरूप आता बदलत आहे. पूर्वी मातीची घरे असायची, त्याची जागा आता मजबूत सीमेंट कांक्रीट च्या घराने घेतली आहे. प्रत्येक घर असे आपले वैशिष्ट जपत असते. माझे लहानपण अगदी छोट्या आकाराच्या सरकारी घरात गेले. अगदी खेटून खेटून बांधलेली चाळी सारखी घरे होती ती. सर्व घरे सारखी तरी प्रत्येक घराचे आप आपले वेगळेपण आसायचे. काही घरात सहज जाता येत असे, त्याला काही वेळेचे बंधन नसायचे, केव्हाही जा घरातली लोक आपलिच वाटायची, परकेपणा अजिबात नाही. या घरात नेमकी जेवणं सुरु असताना गेलो तर, जेवण करण्यासही संकोच वाटत नसे. कधी कधी तर आपल्या घरचा असेल नसेल तो स्वैपाक घेवून एकदम दोन तिन घरची मुले सोबत जेवत असे.

काही घरे मात्र प्रचंड रहस्यमय असायची त्या घरात कोणी फारसे जाण्यास धजावत नसे. अश्या घरात बाहेरून येणारी पाहुने मंडळी सुद्धा बेताचीच असायची. बहुतेक वेळा अश्या घरचा मुख्य दरवाजा बंद असायचा. अश्या घरात लहान मुले देखील मोजकिच असायची. ही मुले बाहेर खेळायला फारशी येत नव्हती. विशेष वाटनारी ही मुले विशेष वातावरणातच ठेवली जायची. अश्या या वेगळ्या वाटणाऱ्या घरात फार तर गणपतीच्या किंवा होळीच्या वर्गणीसाठी आम्ही जात असो. हे घर आतून अतिशय नीट नेटकं असायचं. घरातील मूल घरात देखील खेळत नाही का, असे मला बहुतेक वेळा वाटायचे. अगदी आखिव रेखीव माणसे तसेच त्यांचे आखिव रेखीव घर. अश्या घरातून कधी एकदाचे बाहेर पडतो असे वाटायचे. याउलट काही घरात मात्र सतत येणाऱ्या जाणार्यांचा राबता असायचा. बहुतेक गावाकडची  नातेवाईक मंडळी येत जात राहायची.

 काही घरी गेल्यावर चहा-पाण्याचा आग्रह होतो. अश्या घरात मी चहा कॉफ़ी काहीच पित नाही असे म्हणनारा पाहुना गेला तर घराला फार वाईट वाटते. घरी आलेला पाहुना काहीच न घेता गेला याची रुखरुख घरात जाणवते. काही घरात अगदी औपचारिकता म्हणून चहा विचारला जातो, हे सहज ओळखता येते. अश्या वेळी कितीही मूड असला तरी 'हो घेतो चहा' असे कदाचितच कोणी म्हणेल.

'दारा बांधता तोरण घर नाचले नाचले' असे अगदी बरोबर म्हटले आहे. मंगल कार्य असणाऱ्या अश्या घराचा पदरच वेगळा असतो. हे घर इतर घरांपेक्षा चटकन लक्षात येतात. ग्रामीण भागात अश्या घराला लगन घर म्हणतात. त्या काळात मग मी अमक्या अमक्या च्या घरी चाललो असं कोणी म्हणत नाही. सरळ लगन घरी जातो असे म्हणायचे. अश्या मंगल कार्य होऊ घातलेल्या घराला अचानक आनंदाचे उधान आलेले असते. घरात येणाऱ्या जाणाऱ्या मंडळीचा राबता वाढलेला असतो. रात्री उशीरा उशीरा  पर्यन्त गप्पा  रंगलेल्या असतात. जेवनाच्या मेनू पासून तर पाहूनांच्या यादी पर्यन्त चर्चा रंगते. माना-पानाचे ठरवले जाते. अनेक जुन्या आठवणी निघतात पूर्वी झालेली  चूक आता मात्र  होऊ द्यायची नाही असे ठरवल्या जाते. घराच्या भिंती हे सर्व अनुभवत असते. गेल्या कित्येक दिवसांपासून तरुण मुलीच्या लग्नासाठी पित्याने केलेली पायपीठ त्या घराने पाहलेली असते. त्याकाळात घर काळजीने ग्रासलेले असते. शेवटी मनात असल्या प्रमाणे सोयरिक होते व  तो मंगल सोहळा अनुभवन्यासाठी घर उभे राहतेे. काल पर्यन्त मनासारखा सोयरा मिळालेला असल्यामुळे खुश असणारा पीता मात्र, जस जशी कार्याची तारीख जवळ येते तस तसा उदास होत जातो. घरातल्या एखद्या कोपर्यात  तो आपल्या आसवानां वाट मोकळी करून देतो. घरतल्या त्या पित्याची घालमेल फक्त घरालाच माहीत असते. एवढेच नाही तर त्या घराच्या अंगा खांद्यावर वाढलेली "ती" उद्या पासून तीथली पाहुनी होणार हे त्या घराला माहीत असते. घर हे सर्व मुकाट्याने अनुभवत असते.
घराने अनेक उन्हाळे पावसाळे सोसलेले असतात. घराचाही ऐक ऐक काळ असतो काल पर्यन्त एकसंघ असणार घर दुभंगल्या जाण्याची वेळ सुद्धा अनेक घरांवर येते. परस्परांवर विसंबून असणारी मुले, जाणती होतात. त्यांच्या पंखांमधे बळ निर्माण होते. या घरात आपल्या स्वप्नांचा कोंढमारा होतो, असे त्यांना अचानकच वाटू लागतें. बऱ्याच वेळा अहंकारमुळे घराच्या भिंती कोलमोडू लागतात. ज्यांचे बालपण त्या घराने अनुभवलेले असते तेच अचानक बंड करू पाहतात, ऐकिनाशी होतात, घर हतबल होते, उदास होते. अश्या घराला कितीही रंगरंगोटी केली, सजवले, तरी घरातली उदासी मात्र जात नाही. अश्या घरात पाय  ठेवल्याबरोबर घरातला भकासपणा सहज जाणवते.

घर काही दगड विटा रचून तयार झालेली इमारत नसते, घराला 'घरपण' असते तसे इमारतीला नसते. अशी घरपण नसणारी घरे व विश्रामगृह मध्ये फारसा फरक राहत नाही.

का का बरं पण जेव्हा पासून घराच्या भोवताली असणाऱ्या सुरक्षा भिंतीची उंची वाढली, घरातल्या टिप्या, मोती,खंड्याची जागा मॅंक्स, जॅकी, टफी इत्यादींनी घेतली तेव्हापासून घर पूर्वी सारखी परिचित वाटत नाही.

©सुधीर वि. देशमुख
    अमरावती
01/06/18

No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...