Sunday 21 April 2019

'माफ कर मामा'



      मामा काल मामीचा फोन आला होता, तुझ्या त्या  जोडीतला एक बैल आजारी आहे म्हणे एक आठवड्या पासून. तुला पैशाची अडचण आहे अशी ही सांगत होती. सध्या तू आर्थिक अडचणीत असतो,  आप्पाची शेती चांगली दोन्ही हातानी देत होती ना रे मामा. त्यांच्या  सहा लेकीचे व तुझे लग्न या शेतीच्या भरवश्यावरच केले ना रे आप्पाने. एवढा मोठा खटला पण कधी चनचन नव्हती.

         काय दिवस होते ते कधी एकदाची परीक्षा संपते व तुझ्या गावी येतो असे वाटायचे, शेवटचा पेपर तर अगदी नकोसा वाटे. उन्हाळ्याची सुट्टी व तुझे गाव हे तर जगण्याचा एक भाग होता. तू तुझ्या बैलगाडीला घेवून फाटयावर यायचा, तासन् तास आम्हची वाट पाहत बसायचा. तुझ्या त्या गाडीतून, कधी तुझ्या घरी पोहचतो असे व्ह्ययचे. गाडीचा आवाज येताच  आजी धावत यायची. "आला का रे माया नातू" असे म्हणत एकदा आजीने जवळ घेतले रे घेतले की, त्या कड़क उन्हातला प्रवासही रम्य व्हायचा. हळूहळू तुझ्या सर्व बहिनी व भाचे पोहचायची सर्व घर कसे भरून जायचे. तसे तुझे घर फार मोठे नव्हते पण सर्वाना तिथे जागा होती. गावातली नदी तर गावचा दागीना, गावाला वळसा घेवून जाणारी ही नदी म्हणजे, नवविवाहितेच्या गळ्यातला हार.आज मात्र  तिथे फक्त दगड़ दिसतात.  टेकडीवरचे रामाचे मंदीर तिथे रोज हरिपाठ होत असे तिथल्या त्या टाळ मृदंगाचे आवाज आजही कानात कायम आहे.

         तू शिकला ती शाळा आता पार ओसाड झालीया, तालुक्याला राहणारी एकच मॅडम ती शाळा सांभाळते म्हणे. ती तरी काय सांभाळनार एक दोनच विध्यर्थ्यांना? या शाळेतून शिकुन तुझे काही सोबती आज शहरात मोठ मोठ्या हुद्यावर आहेत असे तूच आम्हाला सांगायचा ना! आता या शाळेवरुन गावतल्या लोकांचा भरवसा कसा रे उडाला? गावातून ऑटोत भरून तालुक्याच्या शाळेत जातात म्हणे आता सर्व मुले.  लहान मूल सुद्धा आता गावात शिकत नाही. काय झाले रे मामा तुझ्या या गावाचे. तुझ्या शेतातली आमराई, त्या मोठ मोठ्या आंब्याच्या झाडांवर चढून आंबे तोळण्यात  काय स्पर्धा असायची आम्हची. त्या झाडांची काळाच्या क्रूर आघातात  केव्हाच् कटाई झालीया. हल्ली आम्हची मूलं मामाच्या गावाला जात नाही.  उन्हाळी सुट्टीत गावी जावून राहत असते हेच त्यांना ठावूक नाही. सुट्टीत वेगवेगळ्या शिबिरातुंन ते संस्कार घेत असतात. "वर्षभर  महागळ्या शाळांतुन व घरुन संस्कार होत नाहीत का ?" असे तू आता विचारू नको.

       तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तू काळलेले कर्ज अजूनही बाकी आहे म्हणे. तुझा तो सोबती, त्याला आम्ही हरीमामा म्हणायचो त्याने गेल्या वर्षी आत्महत्या केली म्हणे. आप्पाच्या तर कोण्या सोबत्याने नाही केली रे मामा कधी आत्महत्या. दरवर्षी कर्जमाफ़ी ची तू वाट पाहतो पण सरकारे बदलतात परंतु तुझी स्थीती मात्र तीच आहे.
       
         मामा खरं सांगू का तुझ्या या स्थितीला आम्हीच ही शहरातली मंडळी जबाबदार. तुझ्या गावच्या नदिवर आम्ही धरण बांधली,गावचं व शेतीचे पाणी शहराला दिलें. पूर्णवेळ विज आम्ही वापरतो परंतु तुला मात्र भारनियमन. झाडांची कत्तल झाली, त्यामुळे पाऊस कमी. शहरे फोपावली, गावे मात्र ओसाड झाली. गरज असते तेव्हा  शेतीच्या मालाला भाव नसतो. तुझा माल बाजारात आला कि भाव पडतो ( पाडल्या जातो) . ओरबडून टाकली रे गावे, खरच पार शेखचिल्ली सारखे केलय आम्ही. मामा खरच तू आम्हा शहरातील तुझ्या भाच्यांना माफच कर.

तुझा भाचा,

डॉ. सुधीर वि. देशमुख
अमरावती.
18/04/17

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...