Tuesday 25 July 2023

गारवाची पंचवीस वर्ष


'गारवा' रिलीज होऊन पंचवीस वर्षे झाली , पाहता पाहता पाव शतक झालं 'गारवा' अजूनही ताजा व टवटवीत आहे. चंद्राच्या शीतल चांदण्याला आयुष्य आहे का ? सांजवेळी ढगाआड लपलेला सूर्य व त्याची ढगांसोबत चालू असलेला लपवाछपवीचा खेळ. मधूनच काही किरणं ढगांच्या आडून बाहेर येतात, जसे मनाला गुंतवण्यासाठीच चालू असते  हे सर्व. मी कित्येक वर्षे झाली आजही आकाशात ढगांचे स्नेहसंमेलन सुरू असले की सर्व विसरून पाहत राहतो. हा ताजेपणा कधी जुना होऊ शकतो का ?  सततच्या पाहण्याने निसर्ग  कंटाळवाणा होत नाही प्रत्येक वेळी त्याची विविध रूपे मनाला भुरळ पाडत असतात. गारवाची जादू आजही कायम आहे त्यातील प्रत्येक गाण्याच्या आधीचं ते जीवघेणं निवेदन, एक एक ओळ आपल्यासाठीच लिहली असावी, असं तेव्हाही वाटायचं आणि आजही वाटते. वैशाखाच्या वनव्याने धरित्री तापून तप्त झालेली आहे. रखरखत्या उन्हाने देहाचे बेहाल झालेले आहे, अशात आषाढ ढगांना सोबत घेऊन येतो व मनसोक्त दंगा घालून जातो. कोरड्या झालेल्या नदीला पाजर फुटतो, ती बेभान होऊन समुद्राच्या मिलनासाठी धावू लागते. डोंगर, झाडी, वेली, वर्षाधारेच्या अभिषेकाने तृप्त होतात. अशावेळी गारवाचे एक एक शब्द या सर्व ऋतुचित्राला बोलतं करतात. अंतःकरणात दाबून ठेवलेल्या भावनेला वाट मोकळी करतात. पक्षी होऊन आकाशात विहार करून यावे तसं मन दरी खोऱ्यातून डोंगर झाडीतून भटकून येते. मन, त्याच्या आशा, त्याची स्वप्न, परत परत ताजी होत राहतात, गारवाही तसाच ताजा होऊन आपल्याला परत परत भेटत राहतो. गारवाच्या नंतर सांजगारवा आला त्यातील 'कधी सांजवेळी मला आठऊनी....' कितीवेळा ऐकलं असेल मी हे गीत. आठवणी शिळ्या होत नसतात, एक एक आठवण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दडून बसली असते. कुठल्या अवचित वेळी झपकन बाहेर येईल सांगता येत नाही. एकाद्या जागेसोबत बिलगून असलेल्या आठवणी घट्ट रुतून बसल्या असतात. तसच गारवा सोबत अशाच आठवणींचं कपाट भरून ठेवलं आहे बहुतेकांनी. नुकतेच गारवाच्या निमित्ताने  मुंबईत 'गारवा हवाहवासा' कार्यक्रम झाला असे कार्यक्रम मराठी समजणाऱ्या प्रत्येक गावागावात होवो. पुढच्या पिढीलाही गारवा असाच चिंब करत राहो एवढंच. 

सुधीर देशमुख
अमरावती. 
२५/०७/२३

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...