Sunday 8 November 2020

"पुलकित "



©सुधीर वि. देशमुख



एखाद्या व्यक्तीची आपल्या आयुष्यात काय जागा असावी ? कधी कधी शब्दही थिटे पडतात. नकळत्या वयात अजाणतेपणी यांची पुस्तके हाती आली. माझा मोठा भाऊ यांचा भारी फॅन होता, यांच्या जवळ जवळ सर्व प्रकाशित ग्रंथांचा वैयक्तिक संग्रह भाऊकडे होता. असं आहे तरी काय यांनी लिहलेले, या उत्सुकतेपोटी मी यांची काही पुस्तके तेव्हा वाचली होती. एकदम सर्व समजत नव्हतं पण वाचतांना गंम्मत वाटायची. नंतर मात्र यांचं एकूण एक प्रकाशित साहित्य आपण वाचायचंच असं ठरवलं, हळूहळू मी ही माझ्या कडे काही पुस्तके जमवली. बरीचशी वाचली, काही परत परत वाचली, काही मोजकी अजूनही बाकी आहे. यासम हाच एवढंच आपण म्हणू शकतो. सुरवातीच्या काळात कारकुनी पासून तर प्राध्यापकी पर्यंत अनेक नोकरी केल्या.  हे भारतीय दूरदर्शनचे पहिले निर्मिती प्रमुख होते. (पहिले प्रधानमंत्री पंडित नेहुरुजींची मुलाखतीच्या कार्यक्रमाची निर्मिती यांचीच) आकाशवाणी,दूरदर्शन,  चित्रपट, नाट्य,एकपात्री सादरीकरण, संगीत, लेखन,भाषण, समाजसेवा अश्या अनेक क्षेत्रातील यांचा संचार बघितला तर आपण थक्क होतो. एक व्यक्ती एकाच आयुष्यात एवढं सर्व कसं काय निर्माण करू शकतो हा प्रश्न पडतो. कुठल्याही क्षेत्रात नवोदितांना सिद्ध करण्यासाठी प्रचंड त्रास होतो हे यांना माहीत होते. यांनी नवीन लोकांना मोकळ्या मनाने शाबासकी दिली. अनेक चांगल्या कलावंतांना माहराष्ट्राशी परिचित करून दिले. आपल्या संपूर्ण हयातीत कोणालाही  जाणिपूर्वक दुखवले नाही, तर फक्त हसवलेच, पण मात्र आणीबाणीचा जिगरबाजपणे विरोध केला. पुढे जनता पक्षाचे सरकार आल्यावर सरकारपासून अलिप्त राहिले. सत्तेशी सलगी करून पदे पदरात पाडून घेणं यांना माहीत नव्हतं. तरी देखील यांच्या कर्तृत्वाच्या भरवश्यावर यांना संगीत, नाट्य व साहित्य इत्यादी क्षेत्रातील मानाची सर्वोच्च पदे मिळत गेली. आचार्य अत्रे म्हणतात यांच्या 'तुज आहे तुजपाशी' या एवढ्या एका नाटकासाठी मी यांना उत्कृष्ट नाटककार मानायला तयार आहे. आणि यांनी हे नाटक फक्त अडीच दिवसात लिहून पूर्ण केलं होतं.  हे  पदमभूषण , महाराष्ट्रभूषण तर आहेतच पण त्याही उपर समस्त मराठी जनतेचे लाडके आहेत. महाराष्ट्राचं "लाडकं व्यक्तिमत्व" म्हणून आजही मराठी जनता त्यांना अभिमानाने संबोधित करते. पुलस्पर्श न झालेला साहित्य प्रेमी कदाचितच आपल्या येथे असेल, आणि एखादा असेल तर तो साहित्यप्रेमी तरी नसेन.  चार्ली चॅपलीन व गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची श्रद्धास्थान होती. चार्लीला तर शांततेचे नोबेल दयायला हवे असे ते म्हणायचे. गुरुदेवांच्या साहित्यवरील प्रेमापोटी चाळीशीच्या नंतर बंगाली शिकले. तिथे शांतिनिकेतनला जाऊन राहिले. समाज कार्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल यांना प्रचंड आस्था होती, विनोबांच्या भूदान यात्रेच्या वेळी काही दिवस त्यांच्या सोबत बिहारला फिरले. बाबा आमटेंच्या आनंदवनला नियमित भेट द्यायचे. त्यांच्या पु ल देशपांडे फाउंडेशनने अनेक सामाजिक संस्थांना मदतीचा हात दिला, त्यांचे दातृत्व विशाल होते. मुक्तांगण पासून तर आमच्या अमरावतीच्या वजीर पटेल पर्यंत अनेक सत्पात्री संस्थेला/व्यक्तींना त्यांनी मुक्तहस्ते मदत दिली. पुलं आनंदयात्री होते, जगण्याचं मर्म त्यांना समजले होते, त्यामुळे ते लौकीक अर्थाने योगी नसूनही योगीप्रमाणे निर्मोही होऊन जगू शकले. त्यांच्या साहित्याने, कलेने आपलं जीवन पुलकित झालं आहे एवढंच आपण कृतार्थ भावनेने म्हणू शकतो. उद्या 'भेटलेल्या आयुष्याचे तू काय केलं?' असं नियतीने विचारलेच, तर 'मी पुलकित होऊन आलो आहे!', एवढं मात्र मी आत्मविश्वासाने सांगेल.


ता. क. :आज यांच्या वाढदिवसाला  गुगलने यांचं डुडल ठेवून समस्त पुलप्रेमींना आनंदित केले आहे. 


अमरावती

८/११/२०२०


बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...