Monday 7 August 2017

"उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !"

"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझीच मी वाट पाहात आहे अजूनही वाटते मला अजूनही सांज रात आहे." कवी सुरेश भटयांनी अनेक गीते रचली. अतिशय अशा उत्कट भावकविता त्यांनी मराठी भाषेला दिल्या आहेत. तरल, मोहक, मनाच्या स्पंदनाशी साद घालणे हे त्यांच्या भावकवीतेचे वैशिष्ट. स्मिता पाटिल यांनी अभिनय केलेल्या "उंबरठा" या चित्रपटातील हे गीत आहे. काळाच्या ओघात आपल्या पती पासून दूर गेलेल्या एका कर्तुत्ववान महिलेच्या मनाची व्यथा या गीतात त्यांनी ती केली आहे. तिच्या मनातील घुसमट त्यांनी समोर आणली आहे. एका पेक्ष्या एक सरस कविता रचुन या माणसाने मराठी भाषेचे पांग खऱ्या अर्थाने फेडले आहे. जिचे जीवनच कोरडे झाले आहे, अश्या मैफिल सुन्या झालेल्या स्त्री ची संवेदना भट
यांनी या गीतात मांडली आहे. या गीतातील एक एक ओळ म्हणजे तिच्या मनाचा मोकळा होत जाणारा पदर आहे. तिचा "तो" जवळ नसल्यामुळे तीची मैफिल तर सुनी झाली आहेच, परंतु आशा मात्र अजूनही जीवंत आहे. आज सुद्धा तिला रात्र चांदन्याचीच वाटत आहे. एवढे जीवन भेसुर झाल्यावर त्याचेच गीत गाणारी, काळोख असतांना सुद्धा रात्र चांदन्याची दिसनारी स्त्री, तिचे ठसठशीत करारी व्यक्तित्व व्याकुळता या गीतात जाणवते.
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

तुझेच मी गीत गात आहे

अजुन ही वाटते मला की

अजुन ही चांद रात आहे
एवढे सर्व होवुनही त्याचा चेहरा मात्र सतत तिला दिसत आहे. हे भास का होतात हे तिला कळन्याच्या आत त्याचे ते हास्य तिला तिच्या मनाच्या आरशात दिसत आहे. ज्या व्यक्तिवर प्रेम केले आहे त्याचा भास सतत होत राहणे स्वाभाविक आहे. तिने कोणालाही, कुठेही पाहो दिसतो मात्र तोच.
कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा

पुन्हा पुन्हा भास होत आहे

तुझे हसू आरशात आहे
जे भास उरी घेवून मी जगत आहे तेच भास तुलाही छेळनारच. आज जरी मी घरी नसले तरी माझे अस्तिव तुला जागो जागी जाणवणार आहे. पारिजातकाला रात्री बहर येतो, पहाटे मात्र सर्व फुले खाली जमिनीवर दिसतात. रात्रितुन बहरायचे पहाटे देवून टाकायचे असे करत राहनारे हे झाड, याचा सुगन्ध हळुवार भोवतीच्या वातवरणात दरवळत राहतो. मी तर आता स्वरांचा पारिजात तुझ्या अंगणात लावलाय, त्याचे सुर तुला छेडनार. जसे माझं काळीज चिरतय तसच तूझे होणार. ते स्वर तुला सतत भेटत राहणार करतील माझ्या असण्याची जाणीव, तू कितीही टाळले तरीही. आता मीच तुझ्या घरी नसल्यामुळे बोलणार कोण, हा स्वरांचा अबोल पारिजात तुला माझ्या सुरांची जाणीव करून देईल.
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा

अबोल हा पारिजात आहे
आता मात्र तिचे मन बेचैन झाले आहे. एवढे की आता त्याचे मन कुठे गुंतले तर नसेल ना ? असा संशय तिला येत आहे. जर मला टाळायचेच होते तर "कशाला हे स्वप्न दखवालेस तू ? " असा सवाल ती आता विचारत आहे. जे माझ्यासाठी तुझ्या अंतरंगात होते ते तू इतर कोणाला देवून मोकळा तर नाही ना झाला? इतर चित्रपटासाठी भट यांना गीत लिहायला सांगितले होते, अनेक दिवस उलटून गेले मात्र गीत काही तयार नव्हते होत. नंतर हे गीत तयार झाले, काही कारणाने नियोजित प्रकल्प पुढे गेला नाही. पुढे हेच गीत जब्बार पटेल यांच्या उंबरठा या चित्रपटा साठी हृद्यनाथ यांनी वापरले. लता दीदी चा स्वरसाज असलेल्या या गितावर हृ्दयनाथ यांनी आपल्या संगीताची मोहक जादू चढवली आहे.
उगीच स्वप्नांत सावल्यांची 
कशास केलीस आर्जवे तू

दिलेस का प्रेम तू कुणाला

तुझ्याच जे अंतरंगात आहे
कवी सुरेश भट यांनी मराठी मातीत लावलेला त्यांच्या कवितांचा पारिजात आजही इथल्या रासिकांच्या हृदयात कायम आहे.

सुधीर वि. देशमुख
अमरावती

No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...