Thursday 23 July 2020

ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता


प्रातिभावन्त लेखक वि. स. खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं हे गीत त्यांचीच पटकथा असलेल्या 'माणसाला पंख असतात' या  १९६१ साली आलेल्या आशयघन चित्रपटातील आहे. सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या प्रेमपटातील हे गीत, आस्तिक  तथा धेय्यवादाचे पुरस्कर्ते असणाऱ्या खांडेकरांच्या दैवी प्रतिभेचा विलक्षण अविष्कार आहे. चित्रपटातील नायक कवी असून हे गीत म्हणजे त्याची 'बेट' कविता आहे. एका प्रसंगात नायिका कवितेचा अर्थ विचारते त्यावेळी नायक तिला सांगतो ही कविता म्हणजे सामाजिक दृष्ट्या वंचीत असणाऱ्या समाजाची आर्जव आहे.  बेटरुपी या वंचितांची समाजरूपी समुद्राला ही हाक आहे, त्यांना जवळ घेण्याची, त्यांचे हक्क त्यांना देण्याची.

ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसि का
दूर दूर आता

रे सुंदर तव तीरी
जग हिरवे धुंद उरी
पातेहि न गवताचे
शोभवि मम माथा

निशिदिनि या नटुनि थटुनि
बघ नौका जाति दुरुनि
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हाता

मीना मंगेशकर अर्थात मीना खडीकर यांनी या गीताला एकदम भारी चाल दिली आहे. लता दिदींचं एवढं सुंदर गाणं त्यांच्या इतर  मराठी क्लासिक गाण्यांसारखं प्रासिद्ध का नाही झालं याचं नवल वाटते.  उषा किरण या बोलक्या  डोळ्याच्या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं हे गीत नेत्राला व कानाला अप्रतिम भेट आहे. हे गीत ऐकतांना नकळत चोखामेळा सारख्या संतकवीने भगवंतांला आपल्या अभंगातून दिलेल्या आर्त हाकेची आठवण येते.

चमचमती लखलखती
तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी
वाचु कशी गाथा

खाली लिंक दिली आहे अवश्य आनंद घ्या.💐

सुधीर देशमुख
अमरावती
२४/७/२०२०
https://youtu.be/hKNSU4e3Pp4



Wednesday 22 July 2020

जागून ज्याची वाट पाहिली !


श्रावणात घन निळा हे गीत मी पहिल्यांदा चक्क बँडवर ऐकले. माझ्या काकाच्या लग्नात नान्होरा सुरू असतांना मी हे गीत ऐकले होते. फार वर्ष झाली आता त्याकाळी मराठी भावगीत बँडवर वाजवत असावीत. त्या लग्नातील एखाद दुसरी गोष्ट सोडली तर फार काही आठवत नाही आता. पण हे गीत व तो प्रसंग अजूनही कसा लक्षात राहिला हे मात्र मला कधीच समजले नाही. शुक्रतारा नावाची कॅसेट होती आमाच्या कडे, त्यामध्ये अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गीत परत अनेकवेळा ऐकलं. कॅसेटच्या जमान्यात मोजक्याच गाण्याचा संग्रह राहायचा त्यामुळे उपलब्द असणारी गाणी ऐकण्याची वारंवारता जास्त रहायची. पुढे हेच गाणं मूळ गायिकेच्या म्हणजे लता दिदीच्या आवाजात ऐकलं. अलीकडे श्रावणाची सुरवात झाली की मी हमखास हे गाणं ऐकत असतो, हळुवार कोणी अंगावरून मायेनं आपला हाथ फिरवल्याचा आभास होतो. हे गाणं चक्क मुंबईच्या गर्दीत, भर गर्मीत लोकल मध्ये तयार झालं, असं या गीताचे कवी मंगेश पाडगांवकर यांनी, एका मुलाखतीत सांगितलं आणि मग धक्काच बसला.
या गीतातील ऐक ऐक ओळ म्हणजे जीव ओवाळून टाकावा अशी आहे.
'जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे-तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी'
काय लिहलय, एकदमच भन्नाट, काळापासून वाट पाहत असलेलं सुख आज दारात आलय आणि आता तर अवस्था अशी आहे की सारा आसमंत हरी ने व्यापून टाकलाय, चराचरात त्याची ठसठशीत मुद्रा या हिरव्यागार निसर्गाच्या निमित्ताने प्रकटलीय.
'गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा'
कोणाची ओळख कोणा सोबत सारं कसं एकरुप. तू, तू नाही आणि मी, मी नाही सारेच भिन्नतेचे भाव संपले आता. काहीही द्वैत नाही तुझे नि माझे. हे नाते जन्मो जन्मीचे त्याची ओळख परत एखादा पटली आता, आणि त्याआधी काय ओळी आहे,
'रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी'
आता या निसर्गाच्या रंगात स्वप्नाचे पक्षी हरवले आहे. हरवणे हा शब्दच मोठा मस्त, असं हरपून जाता आलं पाहिजे, त्याशिवाय क्षणात जगण्याची मजा नाहीच.
'पाचुच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले'
आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर ऊन कसे आहे तर एकदम कोवळं, एकीकडे किशोर अवस्थेतील हिरवळ आणि पलीकडे हे असं जीवाला घोर लावणारं हलकं हलकं कोवळं तारुण्याचं ऊन, मेहिंदीच्या पानावर मन अजून झुलतय ग सारखं.
'मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा'
गगनाचा गाभारा कशाने व्यापला ? मातीच्या गंधाने. या मातीच्या गंधाचे व पावसाचे नाते असेच आहे. पाऊस धरतीला मिठी मारतो आणि आणि ती त्याला या गंधाचं रिटर्न गिफ्ट देते.
'पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा'
इथे तर कवीने कळसच गाठलाय, पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा आणि पुढे शब्दावाचून भाषा. श्रावणाचं हे गीत पुढे प्रीतीचं गीत होतं कळत देखील नाही. अगदी अलगद पणे हा बदल घडून येतो. जे मनात तुझिया तेच माझिया झाल्यावर, मग शब्दाला महत्व राहत नाहीत, शब्द अहेतूक ठरतात, आता या पुढे जे काही आहे ते सारं शब्दावाचून, आता शब्दांच्या कुबड्यांची गरजच नाही.
वारंवार ऐकत राहावं असं हे हिरवंगार, सदा टवटवीत, गीत ऐकतांना, खरंच अंतर्यामी सूर गवसल्या शिवाय कसा राहणार?

सुधीर वि. देशमुख
अमरावती
२२/०७/२०२०

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...