Monday 21 May 2018

वेडिंग फोटोग्राफी एक गम्मत


हल्ली लग्न लागल्यावर ती नवरा आणि नवरी फोटोग्राफर च्या ताब्यात द्यावी लागते, पाहुण्यांना त्यांच्याशी न बोलायची सोय ना शुभेच्छा द्यायची. अशा वेळी पाहुण्यांची नजर जेवणाकडे नाही वळली तर नवलच. तरी बर प्रीवेडिंग फोटोग्राफी आधीच काढून झालेली असते. प्रीवेडिंग फोटोग्राफी हा प्रकार कोणी शोधून काढला त्याला तर एकवीस तोफांची सलामीच दिली पाहिजे (सलामी नेहमी एकवीस तोफांचीच का देतात? गणपतीचा आणि एकवीस आकड्याचा सबन्ध माहीत होता, पण एकवीस आणि तोफेचा काय सबन्ध ? असो आपल्याला काय एकवीस तर एकविसच, तशाही सलामी द्यायला तोफा आहे कुठे?) तर आपण त्या प्रीवेडिंग फोटोग्राफी वर होतो. हल्ली बर्याच बाबी प्रीवेडिंग होतात म्हणून याचीही भरीस भर पडली असावी का? "आमच्या वेळेस नव्हतं बाई असले भलते चाळे" एका लग्नात एक आजी ठसक्यात म्हणाली. चा..ळे ? आजीला फोटोग्राफीचे हे कौंशल्य चाळे वाटत होते. मग आजीच्या घरी पाळणा कसा लांबला होता ? तो एवढा वेळा लांबला होता की, आजोबा पाळणा सतत बांधून ठेवत. एकदा तर एकाच घरात दोन पाळणे एक मायच्या लेकराला व एक तिच्या लेकीच्या लेकराचा. तरी देखील आजी या आधुनिक फोटोग्राफी शास्त्राला चाळे म्हणत होती, त्याचे कारणही तसेच आहे. आजीच्या नातीच्या लग्नात, नातीच्या डोक्यावर अक्षदा पडल्यावर कोणीतरी 'नारायण' टाइप कार्यकर्त्याने आजीला, नातीला व नातजवयाला आशीर्वाद देण्यासाठी स्टेज जवळ आणले होते, पण काय तो दृष्ट फोटोग्राफर त्याने नवरा नवरीचा असा ताबा घेतला की एक तास तरी सोडलेच नाही. कशीतरी त्या फोटोग्राफरच्या तावडीतून सुटका झाल्यावर आजी स्टेजवर जाईल तर मुलाकडच्या फोटोग्राफरने मोर्चा सांभाळला. नवरा मुलगा व नवरीला वेगवेगळ्या पोजेस घ्यायला लावून आता त्याला आपली स्किल सिद्ध करायची होती. नवरीकडचा फोटोग्राफर लहान गावातला हा महानगरातला, त्यात जास्त रेटचा, त्यामुळे नवरी कडच्या फोटोग्राफरने एक तास घेतल्यावर याला जास्त वेळ घेणे आवश्यक होतेच. त्याने दहा पोजेस घेतल्या तर याने पंधारा घेणेच होते. आजी बिचारी, नातीचं व नातजवायचे भावविभोर क्षण असहायपणे उघड्या डोळ्याने सर्वांसमोर पाहत होती, आजी चिडणार नाही तर काय? आजीच काय मुला मुलीला भेटायला आलेले सर्व पाहुणे तातकडत उभे होते पण फोटोग्राफरचे कोणाकडेही लक्ष नव्हतं. अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसायचा तसे याला फक्त नवरा व नवरी.
एक काळ होता नवरा नवरीचा फोटो पाहुण्यांसोबत काढायची रीत होती. (नाही म्हणायला आजही आहे, पण दुय्यम ) आलेल्या पाहुण्यांतला कुणी सुटला तर नाही ना ? अशी काळजी दोन्हीकडच्या यजमानांना राहायची. एखादा 'बालीचा पाहुणा' फोटो काढायचा सुटला तर, केलेल्या सोयीची वाट लागायची. हल्ली मात्र एकदा लग्न ठरले की प्रीवेडिंग शूट पासून सुरू झालेली फोटोग्राफी संपता संपत नाही. तरी बर सेल्फी वैगरे साठी फोन असतातच.फक्त फोटोसाठीच लग्न काढले की काय असे या फोटोंना पाहल्यावर वाटत राहते. हल्ली लग्न झाल्यावर एकदोन महिन्याने कोणाकडे जाण्याचे मी टाळतो कारण गेल्यावर त्या फोटोग्राफरचा पराक्रम चहाच्या घोटासोबत पचवावा लागतो. त्या अल्बममध्ये आपण असण्याची शक्यता कमीच असते, दिसलोच तर एखाद्या कोपर्यात. आणि समजा अल्बम पासून सुटका झालीच तर फेबु आहेच की वेगवेगळी पोजेस पाहायला.
(तळतीप : हा लेख निवळ विनोद निर्माण करण्याच्या उद्देशाने लिहलेला आहे. कोणीही फार गंभीरतेने घेऊ नये, गंभीर वाटल्यास तो दोष लेखकाचा समजावा. )
©सुधीर वि. देशमुख
अमरावती
20/05/18

Thursday 3 May 2018

आम्हा घरी धन

कविता असो की इतर कुठलं ललित साहित्य, आत मधेच कुठे तरी विस्कटलेले असते. काचाचे विखुरलेले तुकडे एकत्रित करावे व छान कोलाज करावा, तसे हे विस्कटलेले विचारांचे तुकडे एकत्रित करावे व शब्दांच्या मदतीने मोहक शब्दशिल्प तयार करावे. एक एक शब्द विस्कटलेला असला की आपला स्वतंत्र अर्थ घेऊन मिरवत असतो हेच शब्द एकत्रित येतात तेव्हा त्यांचे अर्थ बदलत असतात. संदर्भ बदलला तरी शब्दाचा अर्थ बदलत असतो. अर्थ खरच वाक्यातच असतो का ? की तोही असतो कुठेतरी वाचन किंवा श्रवण करनाऱ्याच्या आत खोल खोल. फेसाळलेल्या पाण्यावर बुडबुडे येतात तसेच विचार नेणिवेतून जाणिवेत येतात. एकदा त्यांनी शब्दांच्या आधाराने मूर्त रूप घेतले की ते स्पष्ट होत जातात. पण नेहमीच व्यक्त होण्यास शब्द सहाय्य करतात का? कदाचित नाही, एखादे अर्थपूर्ण मौन हजार शब्दांचा परिणाम साधते. डोळ्यातून पडलेला एक अश्रू, खांद्यावर ठेवलेला एक हाथ शब्दालाही थिटे ठरवतात. शब्दाची ही मर्यादा आपण समजलो पाहिजे.शब्दाला मर्यादा असून सुद्धा शब्दांची महती कमी नाही होऊ शकत. शब्द खूप वापरले पाहिजे असे अजिबात नाही. मोजक्या शब्दात सुद्धा खूप काही मांडता येते. शब्द जर धन आहे तर ते धना सारखेच वापरल्या गेले पाहिजे. धनाची जशी उधळपट्टी केली की कफल्लकता येते तशीच शब्दांची विनाकारणच उधळपट्टी केली तर व्यक्त होणाऱ्याची महती कमी कमी होत जाते. शब्दांच्या मागे जर चरित्र असेल तर ते शब्द मग मंत्र होतात. प्रामाणिक शब्दच ह्रदयात रुजू शकतात. पोकळ, कोरडे, खोटे शब्द कितीही देखणे असले तरी ते घसरून जातात. मग असे निवळ पल्लेदार वाक्य, आखीव रेखीव भाषा म्हणजे शब्दांची हगवणच (verbal diarrhoea) असते.
'तुका म्हणे पहा शब्दचि हा देव
शब्देची गौरव पूजा करू '.

© शब्दवत्सल सुधीर देशमुख
अमरावती
4/5/18

दुभंगलेली_घरे

#दुभंगलेली_घरे
आज दुकानात पनीर घ्यायला गेलो तिथे काकाही आले होते. मी पनीर घेतलं व काकाने दही. काका एकदम रोड झाले होते, खांदे झुकली होती, गाल आत गेले होते. काकाच्या डोळ्यात कसलेही तेज नव्हते. आवाज एकदम कमजोर झाला होता. मी मुलांसाठी चॉकलेट घेतले होते, त्यातले एक काकाला दिले. काकाने चॉकलेट घेतले, चॉकलेट चे कव्हर काढता काढता काकांचे हात थरथरत होते, मोठया श्रमाने काकाने कव्हर काढले व चॉकलेट खाल्ले. मी अधिक एक चॉकलेट काकाच्या हातावर ठेवले म्हटले मावशीला द्या. त्यांच्या व मावशीच्या तब्बेतीची चौकशी केली तर काकाने कोणाचे औषध सुरू आहे , काय त्रास आहे, मधुमेह बिपी इत्यादी बाबत माहिती दिली.
काका व मावशी काही वर्षांपासून अमरावतीला दोघेच असतात. काकाला निवृत्त होऊन 17 वर्ष झाली असेल. काकाला दोन मुलं, दोन्ही मुलांना काकाने भरपूर शिकवले, त्यांची लग्न केली. सध्या दोन्हीही मुले नोकरीवर आहे एक मुंबईत तर एक पुण्यात.
काकाने मोठया मुलाचे लग्न मोठ्या उत्साहात केले, नंतर त्याला मुलगी झाली, काकाने अमरावतीच्या स्वतःच्या घरी मोठे बारसे केले, नंतर पहिला वाढदिवस केला. मोठया मुलाच्या लग्नानंतरची काही वर्षे मजेत गेली. काका व मावशी कधी अमरावतीला कधी मुंबईला राहत होती.
मधल्या काळात काकांचा लहान मुलगाही चांगल्या नोकरीवर लागला काका फार खुश झाले. मला अधून मधून दिसायचे व तुझे काय सुरू आहे विचारायचे, माझ्याकडे उत्तर नसायचं प्रयत्न सुरू आहे अजून कुठे जमलं नाही ऐकले की काका स्वतःच्या मुलांविषयी सांगायचे. काकाच्या दोन्ही मुलांचे असे कौंतुक मी कित्येकदा ऐकले आहे. मी फारसा काही करत नाही म्हटल्यावर त्यांना फारच जोर यायचा. नंतर मी त्यांना टाळणे सुरू केले, दिसले की काही तरी खवचट बोलतील म्हणून माझा नेहमीचा मार्ग बंद केला. नंतर काकाने लहान मुलाचे लग्न केले, त्याचा मुलगा, त्याचे बारसे वाढदिवस इत्यादी गोष्टी मजेत झाल्या. काका मावशीचे छान सुरू होते, कधी मुंबई कधी पुणे तर कधी अमरावतीला, त्यांच्या घरी.
गेल्या तीन एक वर्षांपासून माञ काका व मावशी अमरावतीलाच असतात. त्यांचे दोन्ही सुनांशी वाद झाले म्हणतात. नेमके कोणाचे काय चुकले माहीत नाही. आता त्यांची मुले मोठी झाली त्यांना आमची गरज नाही असे काका व मावशी सांगतात. तर सासू सासरे नीट वागत नाही त्यांच्या चुकीच्या बोलण्याचा आम्हाला त्रास होतो अशा सुना सांगतात. नेमकी कोणाची चूक आहे माहीत नाही. काकांचा स्वभाव थोडा खवचट आहे ,हे जरी खरे असले तरी त्यांनी मुलांसाठी खूप कष्ट घेतली आहे. आणि अशा म्हातारपणी एकाकी राहणे म्हणजे दुःखदच. काका मुलांकडे ऍडजस्ट नाही झाले किंवा मुलांनी त्यांना सामावून नाही घेतले काहीही म्हणा. काहीही कारण असले तरी आज ज्या स्थितीत ते दोघे अमरावतीच्या घरी एकाकी राहतात ते मात्र चिंताजनक आहे. काकांची दोन्हीही मुले समजदार आहेत त्यांनी आमच्याकडे राहावे असे दोघांनाही वाटते. दोघेही हतबल आहेत मार्ग काय काढावा दोघांनाही कळत नाही. असे एक नाही तर अनेक काका व मावशी बहुतेकवेळा दिसत असतात व मनात अनेक प्रश्न निर्माण करतात.
डॉ. सुधीर वि. देशमुख

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...