Thursday 3 May 2018

दुभंगलेली_घरे

#दुभंगलेली_घरे
आज दुकानात पनीर घ्यायला गेलो तिथे काकाही आले होते. मी पनीर घेतलं व काकाने दही. काका एकदम रोड झाले होते, खांदे झुकली होती, गाल आत गेले होते. काकाच्या डोळ्यात कसलेही तेज नव्हते. आवाज एकदम कमजोर झाला होता. मी मुलांसाठी चॉकलेट घेतले होते, त्यातले एक काकाला दिले. काकाने चॉकलेट घेतले, चॉकलेट चे कव्हर काढता काढता काकांचे हात थरथरत होते, मोठया श्रमाने काकाने कव्हर काढले व चॉकलेट खाल्ले. मी अधिक एक चॉकलेट काकाच्या हातावर ठेवले म्हटले मावशीला द्या. त्यांच्या व मावशीच्या तब्बेतीची चौकशी केली तर काकाने कोणाचे औषध सुरू आहे , काय त्रास आहे, मधुमेह बिपी इत्यादी बाबत माहिती दिली.
काका व मावशी काही वर्षांपासून अमरावतीला दोघेच असतात. काकाला निवृत्त होऊन 17 वर्ष झाली असेल. काकाला दोन मुलं, दोन्ही मुलांना काकाने भरपूर शिकवले, त्यांची लग्न केली. सध्या दोन्हीही मुले नोकरीवर आहे एक मुंबईत तर एक पुण्यात.
काकाने मोठया मुलाचे लग्न मोठ्या उत्साहात केले, नंतर त्याला मुलगी झाली, काकाने अमरावतीच्या स्वतःच्या घरी मोठे बारसे केले, नंतर पहिला वाढदिवस केला. मोठया मुलाच्या लग्नानंतरची काही वर्षे मजेत गेली. काका व मावशी कधी अमरावतीला कधी मुंबईला राहत होती.
मधल्या काळात काकांचा लहान मुलगाही चांगल्या नोकरीवर लागला काका फार खुश झाले. मला अधून मधून दिसायचे व तुझे काय सुरू आहे विचारायचे, माझ्याकडे उत्तर नसायचं प्रयत्न सुरू आहे अजून कुठे जमलं नाही ऐकले की काका स्वतःच्या मुलांविषयी सांगायचे. काकाच्या दोन्ही मुलांचे असे कौंतुक मी कित्येकदा ऐकले आहे. मी फारसा काही करत नाही म्हटल्यावर त्यांना फारच जोर यायचा. नंतर मी त्यांना टाळणे सुरू केले, दिसले की काही तरी खवचट बोलतील म्हणून माझा नेहमीचा मार्ग बंद केला. नंतर काकाने लहान मुलाचे लग्न केले, त्याचा मुलगा, त्याचे बारसे वाढदिवस इत्यादी गोष्टी मजेत झाल्या. काका मावशीचे छान सुरू होते, कधी मुंबई कधी पुणे तर कधी अमरावतीला, त्यांच्या घरी.
गेल्या तीन एक वर्षांपासून माञ काका व मावशी अमरावतीलाच असतात. त्यांचे दोन्ही सुनांशी वाद झाले म्हणतात. नेमके कोणाचे काय चुकले माहीत नाही. आता त्यांची मुले मोठी झाली त्यांना आमची गरज नाही असे काका व मावशी सांगतात. तर सासू सासरे नीट वागत नाही त्यांच्या चुकीच्या बोलण्याचा आम्हाला त्रास होतो अशा सुना सांगतात. नेमकी कोणाची चूक आहे माहीत नाही. काकांचा स्वभाव थोडा खवचट आहे ,हे जरी खरे असले तरी त्यांनी मुलांसाठी खूप कष्ट घेतली आहे. आणि अशा म्हातारपणी एकाकी राहणे म्हणजे दुःखदच. काका मुलांकडे ऍडजस्ट नाही झाले किंवा मुलांनी त्यांना सामावून नाही घेतले काहीही म्हणा. काहीही कारण असले तरी आज ज्या स्थितीत ते दोघे अमरावतीच्या घरी एकाकी राहतात ते मात्र चिंताजनक आहे. काकांची दोन्हीही मुले समजदार आहेत त्यांनी आमच्याकडे राहावे असे दोघांनाही वाटते. दोघेही हतबल आहेत मार्ग काय काढावा दोघांनाही कळत नाही. असे एक नाही तर अनेक काका व मावशी बहुतेकवेळा दिसत असतात व मनात अनेक प्रश्न निर्माण करतात.
डॉ. सुधीर वि. देशमुख

No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...