Saturday 14 September 2019

केळीचे सुकले बाग !



विस पंचविस वर्ष झाली असतील, "लता, आशा, उषा" नावाची एक कॅसेट माझ्या वडील भावाने आणली होती. एकूण सहा गाणी असतील त्यामध्ये आता सर्व गाणी आठवत नाही पण "तरुण आहे रात्र अजूनही" व "केळीचे सुकले बाग" हे दोन गीतं होती त्यामध्ये पहिलं आशा ताईचे तर दुसरे उषा ताईचे. ही दोन गाणी सोडली तर त्या कॅसेट मधली इतर गाणी आता नीटशी आठवत नाही. 'तरुण आहे रात्र अजूनही' नंतर अनेक वेळा ऐकण्यात आलं, परंतू 'केळीचे सुकले बाग' नंतर कधी ऐकलय असे आठवत नाही. ज्यावेळी  लतादिदी व आशाताई जास्तीत जास्त हिंदी चित्रपट गीत गात होत्या त्याच काळात उषा ताईने खास मराठी चित्रपटा साठी अनेक गीतं गाईली.  दोघी बहिणी मातब्बर गायिका त्यामुळे उषा ताई कडे कदाचित बऱ्याच रसिकांचे लक्ष जात नाही.  काल अचानक युट्युब वर "केळीचे सुकले बाग" परत ऐकलय. त्यावेळी त्याचा फारसा बोध झाला नव्हता, आता मात्र हे गाणं एकदम मनाचा ठाव घेतय. तसा आताही पूर्ण बोध झाला असे ठाम सांगता येत नाही.

केळीचे सुकले बाग असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पानं असुनि निगराणी

आपल्या नजरे समोर अनेक वेळा होत्याचे नव्हते होते. पाहता पाहता अचानक एखादी जवळची व्यक्ती दूर अनंताच्या प्रवासाला निघून जाते, काही कळत नाही, नेमकं काय झालं ते.  येणारी रोजची सकाळ तिच्या गर्भात काय गुपितं घेऊन येईल कुणास माहीत?  हा जगण्याचा प्रवास असाच अनिच्छितता घेवून सुरू राहतो, आपले कितीही लक्ष असुद्या जीवनावर. अनाकलनीय अश्या अनेक घटना अवती भवती सुरूच असतात. कितीही का निगराणी असू दे पण केळीचे बाग सुखले शेवटी पर्यायाने केळीचे प्राणही सुखले.

किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण बघुनि भवताली.

आता जीवाला नेमकी कशाची ओढ लागलेली आहे? कुठल्या गोष्टीसाठी मन असे भाव विभोर झालेले आहे? कुठली कळ काळजात सल करत आहे?

अशि कुठे लागली आग जळती जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे

ही कविता ऐकतांना ग्रेस यांच्या 'भय इथले संपत नाही' ची आठवण येते. "केळीचे" हा शब्द गातांना उषा ताईने असा स्वर लावला की त्या सुकून भग्न झालेल्या बागेचे दुःख केव्हा आपले होते ते कळत नाही.

किती दूरचि लागे झळ आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा

कवी 'अनिल' यांच्या आशयघन कवितेला चाल लावली 'देव' माणसानी अर्थात 'यशवंत देव' यांनी. खाली गाण्याची लिंक दिलेली आहे अवश्य ऐका.

सुधीर वि. देशमुख
अमरावती
रविवार 15/09/19
https://www.youtube.com/watch?v=urkKbm2ePtQ




No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...