Saturday 24 August 2019

तो तसा घाईत नव्हता !

आज अठरा, एकोणीस  वर्ष झाली असतील, मला ही रचना भेटून मी त्यावेळी बाहेर गावी, खोलीकरुन काही मित्रांसमवेत राहात होतो.. वेळ भरपूर असायचा मग करण्यासारखे विशेष काही नसायचे, संध्याकाळी खोलीवर आलो की कानात हेडफोन टाकून तासं तास गाणी ऐकणे हे नित्याची बाब. वॉकमनचा काळ तो, आवडीची कॅसेट आणायची व ऐकत बसावे. त्यावेळी सुमित म्युझिक कंपनीचा " हा गंध तुझा " हा अल्बम हाती आला. यातील सर्व गाणी/गझल  चंद्रशेखर सानेकर यांची, तर संगीत विजय मोरे यांचे व सर्व गीते गायली आहे खुद्द सुरेश वाडकर यांनी. एखादा व्यक्ती एखादी कलाकृती तयार करतो व ती रचना कुठल्याश्या माध्यमातून श्रोत्यांपुढे किंवा वाचकांच्या हाती जाते. नंतर ती कलाकृती रसिकाला स्वत:ची वाटू लागते. कुठे तरी त्याला स्वत:चेच प्रतिबिंब त्या कलाकृतित दिसत असते, तेच त्या कलाकृतीचे यश. आज एवढे वर्ष झाली परंतु या अल्बम मधील एक एक रचना आत मधे रुतुन बसली आहे. प्रत्येक गितातील शब्द शब्द मनाचा ठाव घेत मेंदूचा कसा ताबा घेतो व कशी किक बसते कळत नाही. मी या अल्बम मधील सर्व रचना  कित्येक वेळा ऐकल्या आहे, किती वेळा सांगता येत नाही, पण प्रत्येक वेळी ही गाणी नवीन, ताजीतवानी वाटतात.

पाहिले नव्हते तिला पण मी तिला माहीत होतो 
मी कधी काळी तिच्याही यौवनाचे गीत होतो 
किंवा
नेमके समजे न मजला मी कसा आहे खरा 
मीच आहे नाव आणि मीच आहे भोवरा 
अशा एका पेक्षा एक सरस रचना या अल्बम मधे आहे प्रत्येक रचनेचा शब्द शब्द टिपून ठेवावा असा आहे. याच अल्बम मधील ऐक रचना म्हणजे,
ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला
 हि मूळ रचना बरीच मोठी आहे, त्यातील काही भागच या गीतात आहे. काय जबरदस्त लिहलेले आहे, वर वर अतिशय साधी सरळ वाटनारी ही रचना माणसाच्या स्वभावाच्या पैलूची आपल्या समोर हळूच उखल करून ठेवते. काळ बदलतो तसा माणूसही बदलतो हे एक कडू वास्तव आहे. काल पर्यंत आपल्या मागे मागे असणारी लोकं अचानक दूर जातात, साधी ओळख न दाखवता अगदी सहज टाळून जातात. आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी एखादी व्यक्ती अचानक पाठ फिरवते, कसा व्यक्त होईल तो व्यक्ती ? एकाकी राहण्याची एकदा तयारी झाली कि मग कोणास काय दोष देत बसावे शेवटी आपणच आपले सोबती.
एकटा आहे मुळी मी हीच सोबत खूप आहे
अन कुणा मग दोष देऊ हात जर निसटून गेला
तू आता तुझा प्राणप्रिय म्हणून सखा सोबती आता ईतर कोणालाच दाखवत आहे मग तो कोण आहे जो तुझे शहर सोडून दूर निघून गेलेला आहे.
जो तुझा आहे दिवाणा तो तुझ्या शहरात आहे
सांग मग तो कोण होता जो शहर सोडून गेलाआता जाब विचाराव, प्रश्न करावे, तर काय होईल ते टाळलेच जातील, आणि मग कितीही खुलाशे झाले तरी त्याला अर्थ काय.
प्रश्न मी साधेच केले टाळले ज्यांना असे तू
की खुलाशांचाच सार्‍या अर्थ मग बदलून गेला
. खाली गाण्याची  लिंक दिलेली आहे अवश्य ऐका.

सुधीर वि. देशमुख
अमरावती
रविवार २५/०८/१९
https://www.youtube.com/watch?v=r_GefvI-Yes


Monday 12 August 2019

दरवाजा



दरवाजा एक प्रवेशाचे माध्यम घराच्या आत मध्ये जायचं आणि तेच घराच्या बाहेर पाडायचं. दरवाजाच्या अलीकडचे जग आणि पलीकडचे जग किती भिन्न किती वेगळे. आत एकदम सुरक्षित वातावरण तर बाहेरचं जग बरेचसे असुरक्षित. आतली माणसं ओळखीची मायेनं झाकून घेणारी, बाहेर भेटतीलच याचा भरवासा नाही. आत बेफिकीर, निर्धास्त राहिलो तरी फारसा फरक पडणार नाही पण बाहेर थोडीशीही गफलत भारी पडू शकते . म्हणून प्रत्येकाने घराचा उंबरठा ओलांडून जातांना आतल्या लोकांची किंमत काय असते हे समजूनच बाहेर पडावे . रात्री कितीही उशीर झाला तरी गुमान घरी परत यावे कारण उंबरट्याच्या आत मध्ये कोणाचं तरी काळीज तुमच्यासाठी बेचैन झालेलं असतं. ते काळीज मग कधी आईचं असतं, कधी पत्नीचं तर कधी तुमच्या चिमुकल्या चिमणीचं. म्हणून घराचा उंबरठा ओलांडताना लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही बाहेरच्या जगात फारसे कोणी असाल नसाल परंतु आतल्या लोकांचे मात्र तुम्ही "जग" असता.

सुधीर वि. देशमुख
अमरावती
12/08/19

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...