Monday 18 January 2021

बाबुल की दुवाएं लेती जा !


सकाळी कष्टाने उभारलेले स्टेज उघडण्याची लगबग सुरू झालेली आहे. कोणीतरी मांडवात मोजक्याच गाद्या टाकत आहे. पक्की रसोई झोडून सुस्तावलेल्या देहांची आवरा आवर सुरू झालेली आहे. मांडवात अगदीच मोजकीच मंडळी शिल्लक आहे. मांडवाच्या आजूबाजूने नवरीच्या घरी, नवरी सोबत पाठवायची एखादी पोक्त बाई आणि एक दोन परकऱ्या मुलींच्या यादीवर अंतिम हात फिरवल्या जात आहे. नवरीच्या आईची उगीच लगबग सुरू आहे, नेमकं कशासाठी इकडे आलो ते तिलाच आठवत नाही आहे. सकाळी "बहारों फूल बरसावों, मेरा मेहबूब आया है!" च्या तालावर मांडवात आलेले नवरोजी नवरीची वाट पाहत मांडवात बसलेले आहे. सकाळी लावून असलेला बालीचा पाहुणा किंवा तत्सम पाहुणे मंडळींचा आव शांत झालेला आहे. मांडवात एक दोन मुलं शेवटचा चहा नाहीतर सरबत वैगरे सारखं काहीतरी फिरवत आहे. तिकडे मांडवाच्या मागे बिछायत वाल्याच्या पोराला, नवरीच्या भावाचा कोर ग्रुप मधला कोणी पोरगा भांडे मोजून देत आहे, त्याचा आवाज आत येत आहे. मांडवातच नवरदेवाच्या बाजूच्या मुलांची आंदनाची( भेटवस्तू) बांधाबांध सुरू झालेली आहे.आणि मग अचानक साऊंड सिस्टमवर सुरवात होते "बाबूल की दुवाएं लेती जा , जा तुझको सुखी संसार मिले !" या गाण्याची, मांडवात असलेल्या कुठल्याही पाहुण्यांचे त्या गाण्याकडे विशेष लक्ष जात नाही, उलट आवरा आता, एवढाच काय या गाण्याचा उपयोग. हे गाणं म्हणजे लग्नातील शेवटच्या टप्प्याची सुरवात. इकडे तिकडे फिरणाऱ्या वर्हाडीना मांडवात बसण्याचा इशारा. पण त्यावेळी या गाण्याशिवाय नवरीची पाठवणी होत नसे. त्याकाळात सकाळी बँडवर "बहारों फूल बरसावों!" व शेवटी रेकॉर्डवर "बाबुल की दुवाएं लेती जा!" या गाण्यांशीवाय लग्न होऊच शकत नव्हती. एकदाचा लग्न लावायला कोणी नसेल तर चालेल, पण ही गाणी वाजलीच पाहिजे असा त्यावेळी दण्डकच असावा. या सर्व लगबघित आतापर्यंत सर्व गोष्टींची रीतसर काळजी घेणारा एक व्यक्ती, मांडवात कुठे तरी कोपऱ्यात बसून आपले ओले झालेले डोळे लपवण्याचा प्रयत्नात असे. हळूहळू नवरदेव नवरी नमस्कार करत करत त्या व्यक्ती पर्यंत यायची आणि मग नवरीचा एकदम बांध फुटायचा. मग ती चुपचाप बसलेली व्यक्तीही आतापर्यंत रोखून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची. काहीवेळ सर्व स्तब्ध होत असे. नवरदेवालाही नेमकं काय करावं कळत नसे, तो मग आपला मोर्चा हळूच इतरांकडे वळवत असे. काल परवा पर्यंत योग्य स्थळ भेटत नाही म्हणून काळजी करणारा बाप आज मात्र आपले हुंदके रोखू शकत नसतो. नवरीची आई मोकळ्या मनाने रडू शकते, बाप मात्र तसा करू शकत नाही. पुरुषांनी रडायचं नसतं, असलं काहीतरी सामाजिक तत्व आपल्याकडे वर्षानुवर्षे जोपासल्या गेलं आहे. याला अपवाद म्हणजे नवरीचा बाप, त्याची ती घालमेल खरंतर कन्यादाना पासूनच सुरू झालेली असते, पण होमच्या धुराने डोळे लाल झाले आहेत असाच तो इतरांना भासवतो.
आज काळ बराच पुढे 'सरकलाय', शहरात तर लग्न मोठं मोठ्या चकाचक हॉलमध्ये, हॉटेलमध्ये होत आहे. नवरीचा बाप सुटात दिसतो. लग्नातील सर्व गोष्टींचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो. लग्न ही इव्हेंट झालेली आहे. "बाबुल की दुवाएं लेती जा!" सारखी गाणी वाजवणे कालबाह्य झालेलं आहे. पण तरी सुद्धा पाठवणीच्या वेळेस वर वर साऊंड सिस्टीम वर वाजत नसलेलं हे गाणं नवरीच्या बापाच्या काळजात मात्र आत आत सारखं सारखं वाजत असतं.

©सुधीर वि. देशमुख
अमरावती
१८/०१/२०२१



बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...