Thursday 14 March 2019

विदूषक

बच्चे कंपनीच्या आनंदाची काही ठिकाणं ठरली असतात. पूर्वी गाभूळली चिंच, त्या चिंचमधील चिंचोके, बुढीका बाल, विदूषक इत्यादी हमखास आनंदाच्या जागा होत्या. विदूषक वा जोकर हा बालपणी भेटला तो सर्कशीतून, अंगविक्षेप करणारा, माकडचेष्टा करणारा, चित्र विचीत्र हावभाव करत हसवणाऱ्या विदूषकाचे वेगळेच आकर्षण राहायचे. अलीकडे मात्र वारंवार असे वाटते की , मुलांच्या जीवनात आनंदाची पेरणी करणारा हा विदूषक स्वतः खरंच एवढा आनंदी राहत असेल का? मुळातच निसर्गाने सामान्य जीवन नाकारलेले बुटके विदूषक मुलांमध्ये खूप लोकप्रिय असतात परंतू सांमान्य उंची नसलेले हे बुटके खाजगी आयुष्यात किती खुश राहत असतील? अलीकडे काही कार्यक्रमात, मुलांच्या वाढदिवसाला  वैगरे काही मिकी माउस, डोनाल्ड, छोठा भीम इत्यादी मुलांच्या आवडीचे पात्र बघायला मिळतात. हवा भरून तयार केलेल्या या मोठ्या बलून च्या आत मध्ये कुठला तरी व्यक्ती असतो. तो आतला व्यक्ती आपल्याला दिसत नाही पण त्याला मात्र बाहेरचं सर्व दिसत असतं. तो जसा आत लपलेला असतो, तसेच त्याच्या  चेहऱ्यावर असणारे कारुण्य देखील लपलेले असते. तसेच रंगरंगोटी केलेल्या विदूषकाच्या चेहऱ्या मागे असणारी विवशता, हतबलता, आपल्या नजरेत येत नाही. आपल्याला दिसते त्याचे  कुत्रीम हास्य, आत आत मात्र किती विवंचना घेऊन जगत असेल ना हा विदूषक?
त्याने खरे तर  पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडले असते मुलांना हसवण्याचे  काम. लहान मुलांना  तो आपला  हक्काचा संवगडी वाटत असतो. आपल्याला हसवणारा हा विदूषक त्यांच्या लेखी  कायम Happy Happy Man असतो. शेवटी काय.....

 'दिसते तसं नसते हेच खरं'.

सुधीर वि. देशमुख
अमरावती
14/03/19




Thursday 7 March 2019

ती



आई होऊन देते आयुष्य,
तर आजी सांगते चार गोष्टी युक्तीच्या,
फुलवते बालपण बहिणीच्या मायेने
देते सोबत पत्नी होऊन उन्हा-तान्हात
फुलवते अंगण परत मुलीच्या रूपात
ती येत राहते अशीच वेगवेगळ्या भूमिकेत
व भरत राहते विविध रंग जीवनात
जाणते मज अपूर्णत्व पुरुषत्वाचे अपरंपार
ती अशी हवीच असते जगण्यासाठी वारंवार
सुधीर वि. देशमुख
महिला दिन ८ मार्च २०१९

Wednesday 6 March 2019

विश्व सारे जणू होय कान्हा !

सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळयाची जणू साऊली
किती वेळा ऐकावे हे गीत, एवढी वर्ष झाली, अनेकवेळा मी हे गीत ऐकलेले आहे आणि प्रत्येक वेळेस हे गीत एकदम ताजे टवटवीत वाटते. संध्याकाळ झालेली आहे माळरानावर चरायला गेलेल्या गाई गावा कडे परतत आहे. त्यांच्या चालण्यात विलक्षण घाई आहे त्यांना परत जाऊन गोठ्यात विसावा घ्यायचा आहे. गोठ्यात वाट पाहत असणाऱ्या हंबरणार्या वासरांना कधी जवळ घेऊन आपल्या दुधाने तृप्त करावे असे त्यांना झालेलं आहे. दिवसभर शंकराच्या बरोबरीने शेतात राबणारी पार्वती देखील गावाकडे निघाली आहे. गाय व माय दोघींनाही आपल्या लेकरांची ओढ लागलेली. दोघींचाही पान्हा भरून आलेला आहे, एकदा लेकराले छातीशी घ्यावे व आपला भरून आलेला पान्हा रिता करावा असे झालेल. आधीच शांत गाव अधिकच शांत झालय. दिवेलागणीची वेळ झालेली , मंदीरात संध्याकाळच्या पूजेची लगबग सुरू,तिथल्या घंटा वाजत आहे, त्याचा आवाज त्या शांत वातावरणात एक गूढ संकेत निर्माण करत आहे, जणू स्वरूपाने अरुपाला दिलेली ती हाक. आणि तिकडे दूर आसमंतात आपल्या घरट्याकडे परत येत असलेले पाखरं, त्या विश्व पालकाचाच संदेश घेवून येत असावी.
धूळ उडवित गाई निघाल्या
शाम रंगात वाटा बुडाल्या
परतती त्या सवे, पाखरांचे थवे
पैल घंटा घूमे राऊळी
हळूहळू हे गीत आपल्या मनाच्या रित्या कोपर्यात साठत जाते, कुठेतरी अवती भवती कदचित आपल्या अगदि आत आत त्या सावळ्याची चाहूल होत जाते.मनाच्या खोल डोहात डुबकी मारावे आणि त्या गोपालकाची अनुभूती घ्यावी. दूर असलेली पर्वताची रांग आता या संध्याकाळच्या प्रकाशात धुसर होत आहे, जशी तिच्या डोळ्यातील काजळाची दाट रेघ.
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळया चाहूली
संध्याकाळी किती विलक्षण हुरहूर असते ना, दिवसभर आपले काम करून तो सूर्यही थकल्या सारखा वाटतो. तो अस्ताला जातो आणि इकडे हळूहळू काळोख दाटून येतो. कुठल्या भावअवस्थेत हे गीत सुधीर मोघेनी लिहले असेल. आशाताईचा स्वर्गीय आवाज व श्रीधर फडकेंचे नादमधुर संगीत, जबरदस्त मेळ जमून आलाय. ऋतू हिरवा या अल्बम मधील हे गीत 'वजीर' या चित्रपटासाठी अश्विनी भावे या देखण्या अभिनेत्रीवर चित्रित झालंय परंतू मला ते पाहणे कधीच भावले नाही. डोळे बंद करून हे गीत ऐकावे व आपल्या मनाच्या कॅनव्हासवर हे संध्याकाळचे मनोहारी चित्र या गीताच्या सहायाने रेखाटत जावे. आपणही हळू हळू या विश्वासोबत कान्हा होऊन या अमृत शब्दाचा पान्हा चाखावा व तृप्त तृप्त होत जावे. यापेक्षा अधिक आयुष्यात काय हवय?
माऊली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी
खाली कॉमेंटमध्ये गाण्यची लिंक देत आहे अवश्य ऐका.
सुधीर वि. देशमुख
अमरावती
०६/०३/१९

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...