Thursday 11 January 2024

बाकी नापासांचे काय ?



त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न. आता अपयश आले तर तो कधीच ही परीक्षा देऊ शकणार नाही. जे स्वप्न घेऊन तो गावातून दिल्लीत आला. जे स्वप्न घेऊन तो गेल्या चार एक वर्षांपासून जगत होता. ज्या स्वप्नासाठी त्याने आपलं कुटुंब सोडलं, पडेल ती कामे, (अगदी शौचालय साफ करण्यापासून) केली. अपमान सहन केला, अवहेलना सहन केली. त्याचं IPS होण्याचं स्वप्न ऐका या मुलाखतीच्या यशावर अवलंबून होतं. अशात त्याला पॅनल मधला एक सदस्य विचारतो "निवड नाही झाली तर काय करणार ?"  , तो क्षणाचाही विलंब न करता सांगतो, "गावी जाऊन शाळा शिक्षक होणार."  इथपर्यंत पोहचल्यावर अपयश आले तर काय करायचे तर त्याच्याकडे  दुसरा प्लॅन तयार असतो. 

लाखो मुलं UPSC ची स्वप्न घेऊन दिल्ली सर करायला पोहचतात, अब दिल्ली दूर नाही म्हणत आपल्याकडे हजारो मुलं स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याची स्वप्न बघत असतात. आपल्या राज्यापुरता जरी विचार केला तरी कितीतरी ग्रामीण व निमशहरी भागातील साधारण घरची मुलं पुणेसारखे शहर गाठून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठं होण्याची स्वप्न पाहत असतात. दरवर्षी UPSC किंवा तत्सम स्पर्धापरीक्षेत यशस्वी झालेल्या मुलांची यादी प्रसिद्ध होते. त्यांचे कौतूक प्रसार माध्यमातून प्रसारित होते. घरी मुलाखत घेणाऱ्यांची गर्दी होते. पण दरवर्षी किती स्पर्धक अपयशी होतात. पास होणाऱ्या पेक्षा अपयशी होणाऱ्यांची यादी किती मोठी असते. त्यांचं पुढे काय होते ? काही लहान मोठया परिक्षेकडे वळतात. काहींचे सर्व प्रयत्न संपतात. काहींची वयोमर्यादा संपते. मग ती सर्व गर्दी कुठे जाते? अधिकारी होऊ न शकलेली किंवा कुठल्याच स्पर्धा परीक्षेत यशस्वी न झालेली ही मुले पुढील आयुष्यात काय करतात?  मी ज्या चित्रपटातील वरील प्रसंग सांगितला आहे त्याच चित्रपटात UPSC चे सर्व प्रयत्न संपल्यानंतर रिस्टार्ट म्हणत त्याच नावाने चहाची कॅन्टीन सुरू करणारा 'गौरी भैया' एकदम भाव खाऊन जातो. पूर्ण ताकत लावली पण अपयश आले, आता सर्व प्रयत्न (Attempt) झाले, मग पुढे काय ? अपयश आल्यावर चहाची कॅन्टीन सुरू करणारा 'गौरी भैया' असो की गावात जाऊन शाळा शिक्षक होणार म्हणून सांगणारा 'मनोज' असो. अपयश आले म्हणजे सर्व संपत नाही सांगणारा '12 Fail' चित्रपट लक्षात राहतो तो या साठी. सत्य कथेवर आधारित सशक्त कथानक, विधु विनोद चोप्राचं खास दिग्दर्शन, चित्रपटातील कथेशी एकरूप झालेलं कलाकार, यामुळं चित्रपट अतिशय प्रवाही झालेला आहे. अगदी आपल्या समोर सर्व कथा घडत असल्याचा भास निर्माण करण्यास, चित्रपटाची सर्व टीम यशस्वी झालेली आहे. 

अंतिम निकालाच्या दिवशी गेट उघडुन  निकाल पाहण्यासाठी धावत जाणारी गर्दी, यातील किती यशस्वी होणार? जी  नाही होणार त्यांनी नेहमी एक दुसरी वाट आधीच शोधून ठेवणे व त्यावर खुशीने मार्गक्रमण करत राहणे.  एका विलक्षण प्रेरणादायी यशाची कहाणी सांगणारा '12 Fail' चित्रपट. विधु विनोद चोप्राचा चाकोरीबाहेरचा आणखी एक उत्तम चित्रपट पाहिला नसेल, तर सर्वानी आवर्जून सहकुटुंब पाहायला काही हरकत नाही.

सुधीर वि. देशमुख
अमरावती.
११/०१/२४

No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...