Friday 20 March 2020

"ब्युटी मागची सत्यकथा!"


हल्ली लग्न कार्य हा एक मोठा इव्हेंट झालाय सर्वसाधारण मध्यमवर्गीय ज्याला विचारवंत नवश्रीमंत म्हणतात तोही भरपूर खर्च करू लागलाय. एकदाच करावं लागतं मग काय घे दाबून, आणि हौशीला कुठे मोल असतं.
अलीकडच्या लग्नात सुगीचे दिवस जर कोणाला आले असेल तर ते म्हणजे केटरिंग, फोटोग्राफर, ब्युटीपार्लर या व्यवसाईक वर्गाला. या शिवाय इतरही छोटे मोठे घटक आहेतच जसे फेटेवाला, घोडेवाला, बँडवाला, मेहंदीवाला इत्यादी. पणखास करून ज्या तीन घटकांना जबरदस्त महत्व आलं ते म्हणजे केटरिंग, फोटोवाले व ब्युटी पार्लरवाल्या लोकांना. यावर फोटोग्राफीवर मी पूर्वी लिहेलच आहे, केटरिंग स्वतन्त्र विषय आहे. ब्युटीपार्लर वर काही बोलूया . अलीकडच्या भागात शहरी, मध्यम शहरी भागात जबरदस्त तेजीत आलेला हा व्यवसाय आहे. लग्नात तर या व्यवसाईकांना प्रचंड मागणी आहे. पूर्वी राणू मंडलचा बदललेला लुक व्हायरल झाला होता तेव्हा पासून माझ्या मनात यांच्या विषयी प्रचंड आदर निर्माण झाला आहे (भीतीयुक्त नाही बरं),  लग्नात नवरीचे मेकअप करून देणाऱ्या पार्लर वाल्या, हल्ली त्यांना ब्युटीशीयन म्हणतात म्हणे, काय ते त्यांचे कौतुक. सध्या पॅकेजचा जमाना आहे,  काय दिवस आले, उद्या एखादा माणूस गेल्यावर म्हणजे देवाघरी गेल्यावर त्याचा मरणोत्तर सर्व विधी करून दयायचे पण पॅकेज येईल. (फार मोठ्या शहरात सध्या आहे म्हणतात) "तुम्ही फक्त मरा पुढचं आम्ही बघतो" अश्या त्या कंपन्या जाहिरात देखील करतील. मग रडण्याच्या कार्यक्रमापासून तर मृताच्या न पाहिलेल्या आत्म्याला थेट स्वर्गात जागा मिळून देण्यापर्यंतच सर्व सेटिंगचा दावा या कंपन्या करतील. त्यातही स्वर्गात कुठे जागा द्यायची, म्हणजे जिथे अप्सरा इत्यादी इत्यादी असतात तिथला रेट जास्त. हल्ली मोठ्या शहरात जिवंतपणी राहायला जागा मिळत नाही, मेल्यावर थेट अप्सरांच्या दरबारातच जागा भेटत असेल तर मरणाऱ्याने भरपूर माल जमा करून ठेवावा, नंतर उत्तराधिकार्या मार्फत या कम्पनीच्या पॅकेज वर खर्च करावा. तर आपला मुद्दा ब्युटीशीयनच्या पॅकेजचा होता. तीनचार दिवस चालणाऱ्या लग्न कार्यात नवरीच्या वेगवेगळ्या दिवसाच्या मेकअपचं पॅकेज असते. पन्नास हजारांपासून तर लाखापर्यंत म्हणजे नवरीला किती बदलून टाकावे यावर रेट ठरत असावे कदाचित. एकदा मी माझ्या एका परिचित मुलाच्या लग्ना नंतरच्या सत्यनारायणच्या कथेला गेलो होतो. सत्यनारायणच्या कथेला लग्नात विशेष महत्व आहे, लग्न झालेल्या तमाम लोकांना माहीत आहेच. तर घरातील म्हाताऱ्या बाया सोडल्या तर इतर फारसं कथेला कोणी दिसलं नाही. घरातील काही मंडळी कामात होती, काही पाहुनी सेल्फी काढत होती तर काही लग्नात काढलेल्या सेल्फी पाहण्याचे महत्वाचे काम करत होती. नंतर स्थानिक पाहुण्यांची हळूहळू गर्दी वाढली पण ती कथेसाठी नसून त्यानंतरच्या जेवणासाठी होती, हे मी पटकन हेरलं. माझा वेळचा अंदाज चुकला म्हणून मला कथेला सामोरे जावं लागलं होतं. सांगायचा मुद्दा म्हणजे सत्यनारायणाच्या कथेत बसलेली नवरी व मी लग्नात पाहिलेली नवरी एकदम वेगळी वाटत होती, तसं आपल्याला दुसऱ्याच्या बायकोत कशाला इंटरेस्ट. पण लग्नातली वधू व या मुलाच्या बाजूची वधू कुठेही एकसारखी दिसत नव्हती. नवरा मुलगा मात्र तोच असल्याची मी परत खात्री करून घेतली. दोनदिवसात काय झाले कळत नव्हते. विशेष म्हणजे स्वागत समारंभाला पण ही मुलगी नव्हती, मग या गड्याने दोन दिवसात नवीन आणली कुठून ? कसं काय जमतं बुवा यांना ? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात लॉगइन करत  होते. सत्यनारायण झाल्या शिवाय जेवण सुरू होणार नव्हते त्यामुळे विचार करायला वेळ होता, म्हणून विचार करत होतो, नाहीतर आपण आजिबात दुसऱ्याच्या भानगडीत पडत नाही. आणि एकदम 'रोणू मंडल' आठवली अरे लेक या ब्युटीशीयनच्या हाताची तर  नाही ना ही जादू ? म्हणजे श्रीमंती पूजन, हल्ली हा पण वेगळा इव्हेंट आहे, (फक्त श्रीमंत लोकच हा कार्यक्रम करतात म्हणून याला श्रीमंती पूजन म्हणत असावे असे मला पूर्वी वाटायचे. ) लग्न व रिसेप्शन इथपर्यंतच या ब्युटीशीयनचा काँट्रॅक्ट होता तर (ठेका म्हटलं असतं पण चांगलं वाटत नाही, बांधकाम करणारे ठेकेदार ठेका घेतात, पण ब्युटीशयनाला कसं ठेकेदार म्हणावं तसे तेही चेहऱ्याची बांधणी करूनच देतात म्हणा.) हळूहळू मला चित्र व नवरीचा चेहरा स्पष्ट होत गेला. म्हणजे मेकअपच्या मागच्या नवरीचे आजचं सत्यनारायणाच्या निमित्ताने सत्यदर्शन झाले तर. म्हणजे पूर्वी वधू पडद्यात राहायच्या म्हणे , हल्ली मेकअपच्या मागे राहतात. असो आपल्याला काय जेवण सुरू झाले व मी विचार मंथनामुळे आलेल्या श्रमाचा बदला जेवणाचा समाचार घेऊन घेतला हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल.
तर ब्युटीशीयनच्या पॅकेजची गोष्ट लग्नानंतर तो देखील हल्ली चर्चेचा विषय असतो म्हणे. या पॅकेजचे रेट ब्युटीशियच्या रूपांतर कराच्या हस्तकलेवर तर असतच, शिवाय गरजे प्रमाणे देखील रेट बदलत असतात. इतर पॅकेज सारखे या पॅकेज मध्ये देखील ऑफर असतात जशे नवरी सोबत नवरीच्या आईचा मेकअप फ्री किंवा इतर वर्हाडी स्त्रियांचेे डिस्काउंट मध्ये रेट इत्यादी. मराठी नवरीला साऊथ इंडियन, साऊथच्या नवरीला एकदम पंजाबी करण्याच्या नाना कसब ब्युटीशीयनच्या हातात असतात. अर्थात नवरीच्या बापाचा खिसा जेवढा मोठा तेवढा हा चमत्कार घडून येतो. पूर्वी लग्नात असणाऱ्या भटजी बुवांना विशेष मान होता, नाही म्हणायला आताही आहे, पण आता ब्युटीशीयन, फोटोग्राफर इत्यादी मंडळींना भारी मान असतो. एकदाचे लग्न लावून देणारे महाराज नसले तर चालेल पण ब्युटीशीयन, फोटोग्राफर यांच्या शिवाय लग्न होऊच शकत नाही. लग्न उशिरा होण्या मागची अनेक कारणं जी असतात त्यातील हे देखील एक कारण असू शकते. घोड्यासमोर त्याला हेवा वाटेल अश्या पद्धतीने नाचणारी नवरदेवाची शालीन मित्रमंडळी उगीच बदनाम आहेत, असं आमचं ठाम मत आहे. (आम्ही घरात सोडून अर्थात स्वतःच्या, इतर सर्व ठिकाणी ठाम मत ठेवतो हे सुज्ञ वाचकांना माहीत आहेच. ) तर सांगायचा मुद्दा म्हणजे हल्ली ब्युटीशयनाला तेजीचे दिवस आहेत, बाजरात असलेल्या मंदीचा फटका इतर धंदाना बसला पण या प्रोफेशनला (धंद्याला प्रोफेशन म्हटले की वजन येतं काही व्यवसाय मात्र धंदाच असतात जशे दूध विकणे इत्यादी ) नाही. माणसाचा खरा चेहरा कळत नाही असे फिलॉसॉफर लोकं म्हणतात, मग नवरीचाच तरी का बरं कळावा?

डॉ. सुधीर विनायकराव देशमुख
अमरावती

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...