Thursday 3 May 2018

आम्हा घरी धन

कविता असो की इतर कुठलं ललित साहित्य, आत मधेच कुठे तरी विस्कटलेले असते. काचाचे विखुरलेले तुकडे एकत्रित करावे व छान कोलाज करावा, तसे हे विस्कटलेले विचारांचे तुकडे एकत्रित करावे व शब्दांच्या मदतीने मोहक शब्दशिल्प तयार करावे. एक एक शब्द विस्कटलेला असला की आपला स्वतंत्र अर्थ घेऊन मिरवत असतो हेच शब्द एकत्रित येतात तेव्हा त्यांचे अर्थ बदलत असतात. संदर्भ बदलला तरी शब्दाचा अर्थ बदलत असतो. अर्थ खरच वाक्यातच असतो का ? की तोही असतो कुठेतरी वाचन किंवा श्रवण करनाऱ्याच्या आत खोल खोल. फेसाळलेल्या पाण्यावर बुडबुडे येतात तसेच विचार नेणिवेतून जाणिवेत येतात. एकदा त्यांनी शब्दांच्या आधाराने मूर्त रूप घेतले की ते स्पष्ट होत जातात. पण नेहमीच व्यक्त होण्यास शब्द सहाय्य करतात का? कदाचित नाही, एखादे अर्थपूर्ण मौन हजार शब्दांचा परिणाम साधते. डोळ्यातून पडलेला एक अश्रू, खांद्यावर ठेवलेला एक हाथ शब्दालाही थिटे ठरवतात. शब्दाची ही मर्यादा आपण समजलो पाहिजे.शब्दाला मर्यादा असून सुद्धा शब्दांची महती कमी नाही होऊ शकत. शब्द खूप वापरले पाहिजे असे अजिबात नाही. मोजक्या शब्दात सुद्धा खूप काही मांडता येते. शब्द जर धन आहे तर ते धना सारखेच वापरल्या गेले पाहिजे. धनाची जशी उधळपट्टी केली की कफल्लकता येते तशीच शब्दांची विनाकारणच उधळपट्टी केली तर व्यक्त होणाऱ्याची महती कमी कमी होत जाते. शब्दांच्या मागे जर चरित्र असेल तर ते शब्द मग मंत्र होतात. प्रामाणिक शब्दच ह्रदयात रुजू शकतात. पोकळ, कोरडे, खोटे शब्द कितीही देखणे असले तरी ते घसरून जातात. मग असे निवळ पल्लेदार वाक्य, आखीव रेखीव भाषा म्हणजे शब्दांची हगवणच (verbal diarrhoea) असते.
'तुका म्हणे पहा शब्दचि हा देव
शब्देची गौरव पूजा करू '.

© शब्दवत्सल सुधीर देशमुख
अमरावती
4/5/18

No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...