Thursday 23 July 2020

ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता


प्रातिभावन्त लेखक वि. स. खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं हे गीत त्यांचीच पटकथा असलेल्या 'माणसाला पंख असतात' या  १९६१ साली आलेल्या आशयघन चित्रपटातील आहे. सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या प्रेमपटातील हे गीत, आस्तिक  तथा धेय्यवादाचे पुरस्कर्ते असणाऱ्या खांडेकरांच्या दैवी प्रतिभेचा विलक्षण अविष्कार आहे. चित्रपटातील नायक कवी असून हे गीत म्हणजे त्याची 'बेट' कविता आहे. एका प्रसंगात नायिका कवितेचा अर्थ विचारते त्यावेळी नायक तिला सांगतो ही कविता म्हणजे सामाजिक दृष्ट्या वंचीत असणाऱ्या समाजाची आर्जव आहे.  बेटरुपी या वंचितांची समाजरूपी समुद्राला ही हाक आहे, त्यांना जवळ घेण्याची, त्यांचे हक्क त्यांना देण्याची.

ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसि का
दूर दूर आता

रे सुंदर तव तीरी
जग हिरवे धुंद उरी
पातेहि न गवताचे
शोभवि मम माथा

निशिदिनि या नटुनि थटुनि
बघ नौका जाति दुरुनि
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हाता

मीना मंगेशकर अर्थात मीना खडीकर यांनी या गीताला एकदम भारी चाल दिली आहे. लता दिदींचं एवढं सुंदर गाणं त्यांच्या इतर  मराठी क्लासिक गाण्यांसारखं प्रासिद्ध का नाही झालं याचं नवल वाटते.  उषा किरण या बोलक्या  डोळ्याच्या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं हे गीत नेत्राला व कानाला अप्रतिम भेट आहे. हे गीत ऐकतांना नकळत चोखामेळा सारख्या संतकवीने भगवंतांला आपल्या अभंगातून दिलेल्या आर्त हाकेची आठवण येते.

चमचमती लखलखती
तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी
वाचु कशी गाथा

खाली लिंक दिली आहे अवश्य आनंद घ्या.💐

सुधीर देशमुख
अमरावती
२४/७/२०२०
https://youtu.be/hKNSU4e3Pp4



No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...