Friday 28 August 2020

'शांत न होणारी धग'

 उद्धव शेळके यांची 'धग' ही कादंबरी मराठी साहित्यातील क्लासिक आहे. विदर्भाच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर असलेली ही कादंबरी एका सामान्य स्त्रीच्या असामान्य संघर्षमय जीवनाचा शोकांतिक प्रवास आहे. मी फार पूर्वी पंधरा एक वर्षांपूर्वी ही कादंबरी वाचली होती, त्याच वेळी ही कादंबरी मनात जागा करून गेली. त्यानंतर अलीकडेच ही संघर्षमय जीवनगाथा वाचली, अनेक दिवस मन या कादंबरीतून बाहेर निघत नव्हते. वाचता वाचता कधी आपण कौतिकच्या जीवनाशी समरस होतो कळत नाही. एक एक पात्र आपल्या देखत संवाद साधत आहे असा भास झाल्याशिवाय राहत नाही. ही ग्रामीण भागातील एका स्त्रीची धगधगती कहाणी वाचून झाल्यावर मी अनेक दिवस अस्वस्थ झालो होतो, काही केल्या कौतिक डोक्याच्या बाहेर निघत नव्हती. कादंबरीतला एक एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता. कौतिकची धळपड, वेदना, परिस्थितीशी दोन हाथ करतांना होणारी फरफट, आपलीच असावी एवढी सच्ची ही कादंबरी आहे. कौतिकच भूत सहजासहजी उतरत नव्हतं. आपल्या फाटक्या संसाराला ठिगळं लावण्यासाठी धावणाऱ्या अनेक स्त्रिया अवती भवती दिसतात, तेव्हा कौतिकची आठवण आल्याशिवाय राहात नाही. संसाराची विलक्षण ओढ निसर्गाने स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त दिली असावी,कर्ता पुरुष बेजबाबदार पणे वागला तर संसाराचा भार स्त्रीच्या खांद्यावर येतो. आत्महत्या केलेल्या पुरुषाची स्त्री त्याच्या नंतर आपल्या मोडक्या तोडक्या प्रपंचाचा गाढा ओढतेच ना.

 कादंबरीतील संवाद साधे आहेत, सरळ आहेत आणि एकदम थेट आहेत. लेखकाने भाषा अलंकारिक करण्याचा, संवादात उगीच तत्व पेरण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही. जे काही आहे ते सर्व नैसर्गिक आहे, बोली भाषेतील म्हणी व वाक्प्रचार यांच्या सुयोग्य वापराने संवाद जबरदस्त प्रभावी झाले आहेत. उद्धव शेळके यांच्या नावावर अनेक ग्रंथ आहेत, त्यांनी एक 'धग' जरी लिहली असती तरी त्यांना श्रेष्ठ कादंबरीकार म्हणावं एवढी उल्लेखनीय ही कादंबरी आहे.

'धग' ही शिंपी समजातील महादेव व कौतिकची कथा असली तरी कथेची नायिका कौतिकच आहे. तिच्या माहेरची लोकं, तिचा सासरा रघुनाथ शिंपी, तिची मुलं भीमा, नामा, यसोदा, तिचे शेजारी सीता, सुकदेव नंतरच्या काळात ती ज्यांच्या घरी राहते ते कासीम व सकिनाचं कुटुंब इत्यादी सर्व पात्र आपल्या समोर लेखकाने सहज उभी केली आहे. बहुतेकांनी ही कादंबरी वाचली आहे, अनेकांनी अभ्यासली आहे, यावर भरभरून लिहलेले आहे. उत्कृष्ट साहित्याचा अस्सल नमुना ही कादंबरी आहे , ज्यांनी अजूनही वाचली नसेल त्यांनी 'धग' अवश्य वाचावी.

सुधीर वि. देशमुख


अमरावती

२९/०८/२०२०

No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...