Monday 7 August 2017

हास्ययोग

निखळ, सहज हास्याचे वयाचे व्यस्त प्रमाण असावे, असे मला बऱ्याच वेळा वाटते. एवढेच नाही तर मनुष्य जो जो मोठा होतो ते ते त्याचे हास्य कमी होत जात असावे. अर्थात याला काही अपवाद आहेतच. मुळात काही वयस्क लोकांना खळखळुन हासणे हे कमी पणाचे वाटत असावे. निखळ हास्य विद्वता या गोष्टी चे सुद्धा व्यस्त प्रमाण असावे, बरीच विद्वान मंडळी चारचौघात खळखळून हसायला कचरतात. आपल्या हसण्याचा चुकीचा संदेश जाईल असे बहुतेक त्यांना वाटत असावे. 
     स्टेटेस्कोप गळ्यात असणाऱ्या व्यक्तीला तर हसण्याच बंधनच असते , असे मला माझ्या बालपणी वाटायचे. पूर्वीच्या घरांतील बाप नावाचे व्यक्ती फारच गंभीर असायचे. आम्ही पूर्वी रहात होतो तिथे शेजारील काका-काकुला चार मूली होत्या मूली तशा चांगल्याच होत्या, पण संध्याकाळी काका घरी परत आले की अचानक त्यांच्या घरात स्मशान शांतता व्हायची. घराचा मालक घरी नसताना मोकळ्या मनाने खुलनारं घर मालक घरी आल्यावर एकदम गंभीर होत असे. त्या तसल्या बदलाची घराच्या भिंतीनाही सवय झाली असावी. आपल्या मूली मोकळ्या मनाने गप्पा गोष्टी करत हसल्या तर बिघडतील असा काहीसा समज त्या काकाचा असावा. ज्या घरात गप्पांचे फळ रंगत नाही ते घर कसले? अबोल, कमी बोलणाऱ्या माणसांच्या घरात जायची मला नेहमीच भीति वाटत आली आहे. असल्या घरांच्या भिंती, त्यातील वस्तू एकदम अंगावर आल्यासारख्या भासतात. ज्या घरातून सुन मुलींचा हास्याचा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतो असा एक सुविचार नुकताच माझ्या वाचनात आला, दोष वास्तुत असतो की माणसाच्या मेंदूत हा ही एक संशोधनाचा विषय आहे.

      मुळात हसण्यासाठी फारसे कष्ट लागत नाही, परंतु एवढी सहज नैसर्गिक क्रिया आपण कशी काय गमावून बसतो कळतच नाही. हसण्यापासून अशी फारकत घेतल्या मुळे मग हास्य क्लब लावावे लागतात. काही लोकं हास्य क्लब मधे सकाळी जबरदस्ती ने हासतात आता आपण दिवसभर गंभीर राहायला मोकळे झालो अशा समजूतीत दिवसभर राहतात, (सकाळचा विधी करून मोकळे व्हावे तसे). आपल्याला सहज हसताही येवू नये या पेक्ष्या दुर्दैवी गोष्ट कुठली असावी? केवळ आपण सहज हसल्या मुळे समोरील व्यक्तिवरील ताबा जाईल ही एक भीति बऱ्याच जनांना वाटत असते. स्वत: मोकाळ्या मनाने हसणारी इतरांनाही हसवणारी माणसे सदा सर्व काळी तुम्हा आम्हा सर्वांना भेटत राहावी.

सुधीर वि. देशमुख
अमरावती

No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...