Wednesday 1 August 2018

माझी साहित्यगिरी

लिखाणाची आवड मला फार म्हणजे फारच पूर्वी पासून आहे. काही लोकं याला कुत्सितपणे खोड म्हणतात.(पण लिखाण हे माझ्या खोडात नसून मुळातच आहे.) माझ्या एका दूरच्या मावशीनुसार मी पहिले लिहू लागलो व नंतर बोलू लागलो. काही वाचकांचा या बाबीवर विश्वास बसणार नाही, ही बाब वेगळी परंतु लेखन करणाऱ्याने नेहमी सत्याचाच पदर धरावा भलेही तो पदर कितीही जीर्ण असला तरी. सुरवातीला वर्तमानपत्र, नियतकालिक असे करता करता मी अलीकडे आजचे आधुनिक समाज माध्यमे जसे फेसबुक व व्हाटसअॅप वर लिखाण करू लागलो. इतर माध्यमांपेक्षा ही आधुनिक माध्यमे वेगळी असल्यामुळे मला सुरवातीला फार निराशाजनक अनुभव आला, परंतु त्यावर मी कसा तोडगा काढला इत्यादी गोष्टी मी आज आपल्या सोबत शेयर करणार आहे. वास्ताविक मला अनेक वाचकांकडून तसा आग्रहच झाला आहे , नाहीतर ही बाब मी कोणालाही सांगणार नव्हतो. अर्थात काही कुत्सित वाचकांना ही बाब बतावणी सुद्धा वाटू शकते, पण त्याला माझा इलाज नाही. फेसबुक व व्हाटसअप वर प्रकाशित झालेले (अर्थात ते मी स्वत:च प्रकाशित करत होतो.) माझे लिखाण फारसे कोणी मनावर घेत नव्हते, वाचत नव्हते, त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मी फार बेचैन झालो होतो, अस्वस्थ झालो होतो, काय करावे मला काही समजत नव्हते. आपले नेमके काय चुकते आहे, काहीच कळत नव्हते. दर्जाच्या बाबतीत म्हणाल तर व्हाटसअॅप वर फास्ट फारवर्ड होणाऱ्या इतर लीखाणापेक्षा माझे लिखाण कुठेही कमी नव्हते. कोणी वाचतच नसल्यामुळे लिखाण कसे वाटले हे विचारण्याचीही सोय नव्हती. आपली साहित्य सेवा व्यर्थ वाया जाताना पाहुन माझे हृदय भयंकर कासावीस व्हायचे. त्या घनघोर दुःखात माझ्याकडून अधिक दोनचार कविता प्रसूत व्हायच्या. साहित्यिक साहित्य प्रसूत करत असतो, प्रसूतीच्या कळा काय असतात त्या साहित्य निर्माण करणार्याला माहीत असतात. बर्याच वेळा तर सिजर करून साहित्यिकअपत्ये प्रसूत करावी लागते. कधी कधी हे सीजर वारंवार होत असल्यामुळे बरीच अपत्ये अपुर्या दिवसाची किंवा कुपोषितच जन्म घेतात. माझ्या या प्रसूत झालेल्या कवितांचे नशीब जन्मापूर्वीच ठरले असाल्यामुळे दुसरे काय होणार?इतर लिखाणाप्रमाणे या कावितांच्याही वाटेला फारसे कोणी जात नव्हते. लिखाणाला अधिक व्याप्ती मिळण्याच्या दृष्टीने मी काही हौशी लेखकांच्या एक दोन व्हाटसअॅप समूहामध्ये प्रवेश केला. (लिखाणाला खोली नसले तर चालते पण व्याप्ती ही असावीच लागते.) परंतु त्यामध्ये सर्व लेखकच असल्यामुळे कोणी वाचत नव्हते. सर्व भराभर लिहणारे. आपण आपली एक कविता पोस्ट केली की लगोलग इतर सर्व आपली कविता सोडून लगेच सूड घ्यायचे. नंतर मी खास व्हाटसअॅप वाचकांचा ‘आम्ही हौशी वाचक’, 'वाचाल तर वाचाल', 'वाचे त्याचे काम ना नाचे', 'वाचणार तोच लिहणार' नावाचे काही समूह प्रवेशित केले. यां समूहांमधे लीहणारे जरी कमी असले तरी फारवर्ड करणारे भरपूर होते. मी ऐक कविता पोस्ट केली रे केली की लगेच एकच व्यक्ती चार चार कविता फारवर्ड करून मला नामोहरण करायचा. मी आजिबात नाउमेद झालो नाही. नंतर मी बालवाडीच्या पासून तर पीएचडी पर्यंतच्या मित्रांचे वेगवेगळे व्हाटसअॅप समुह, जसे सकाळी फिरायला जाणाऱ्यांचा , फिरायला न जाणाऱ्यांचा , कार्यालयातील मित्रांचा , रोज रेल्वेने अपडाऊन करणाऱ्यांचा, मुलांच्या शाळेतील पालकांचा , स्कुलबस मधील मुलांच्या पालकांचा , मुलं शिकवणीला जातात तेथील मुलांच्या पालकांचा , आम्ही नेहमी जिथे चाट खातो तिथेच चाट खाणाऱ्या खवय्यांचा , जिथे गाडी दुरुस्त करतो, कटिंग करतो त्या ग्राहकांचा , वेगवेगळ्या थोर व्यक्तींना मानणाऱ्या व्यक्तींचा , कुंभ राशींच्या लोकांचा , ऑक्टोबर महिन्यात जन्म घेतलेल्या , एवढेच काय आमची कामवाली ज्या ज्या घरी जाते त्या घरातील सदस्यांचा , मधुमेह असणाऱ्या व्यक्तींचा (मला मधुमेह नाही पण माझ्या वडिलांना हा आजार असल्या मुळे मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून या समूहात आहे.या समूहाचे नाव 'साखरेचं टाळणार त्याचा यम टळणार' असेे आहे.) याशिवाय माझ्या नातेवाईकांचा, पत्नीच्या नातेवाईकांचा , जातीचा, पोट जातीचा असे ऐकून ऐका समूहांमध्ये मध्ये साहित्य फिरवण्याचा प्रयत्न केला परंतू प्रातिसाद शून्य. यातील बऱ्याच समूहांचा मी स्वतःच समूह संचालक आहे हे आतापर्यंत चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच व मी कुठल्या उदात्त भावनेने हे समूह सुरू केले हेही ओळखले असेल.
आपले लेख नाना पाटेकर, विश्वास नागरे पाटील, प्रकाश आमटे इत्यादी महनीय व्यक्तींच्या नावे पाठवावा असा ऐक स्वप्रसिद्धीचा त्याग करणारा महान विचार माझ्या डोक्याला स्पर्शून गेला परंतु तो विचार फक्त स्पर्शुनच गेला आंत मध्ये न गेल्यामुळे मी तो विचार बाजूला ठेवला ( तसेही या तिघांच्या नावे एवढे लेख फारवर्ड होत असतात की त्यांची साहित्य संपादा आता त्यांनाही कळेेनासी झाली आहे. मध्ये मध्ये तर शेतीशास्त्र किंवा पाकशास्त्र यां विषयांची माहिती सुद्धा काही सुपीक डोके यांच्या नावाने फारवर्ड करतील का? अशी भीती मला वाटायची.) मधल्या काळात हा लेख वाचून फारवर्ड केल्यास २ gb डाटा फ्री, किंवा बॅटरी फुल, जमा झालेले व नकोशे असलेले सर्व फोटो आपोआप डीलिट(आपोआप जमा होतात तसे) अश्या तळटीप टाकायच्या, असा विचार देखील आला, परंतु विज्ञानवादी लोकं आक्षेप घेवून आपले अज्ञान उघडे पाडतील हा दुसरा विचार माझ्या डोक्यात आला, व तसे करणे टाळले. आपल्या लिखाणाचा टी. आर. पी. वाढवन्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते आणि अचानक मला ऐक शक्कल सुचली. मी माझ्याच लिखाणातील माझे नाव काढून, लेखकाचे नाव माहीत नाही पण ज्यानेही लिहले जबरदस्त लिहलय, लेखक कोण आहेत माहीत नाही पण ज्यानेही लिहले त्याला 21 तोफांची सलामी, (ही सलामी नंतर मी वाढवत वाढवत 100 तोफांपर्यंत नेली आहे.) अतिशय महत्वाचा लेख शेवट पर्यंत वाचा, शेवटपर्यंत वाचल्यास आपण शेयर केल्याशिवाय राहणार नाही, फारवर्ड अज रीसिव्ड, असल्या टीपा लिखाणाच्या सुरवातीला टाकने सुरु केले. काय चमत्कार मी हा विकल्प सुरु करताच माझे लीखाण विविध समुहात फिरणे सुरु झाले. माझे लिखाणावर बर्याच कॉमेंट, लाईक, शेयर सुरु झाले. आपले लीखाण अनारौस होऊन का होईना गुण्या गोविंदाने सोशिअल मिडियावर नांदते आहे यांचे मला मनस्वी समाधान मिळू लागले. अर्थात सर्वच निनावी करून फिरणारे लिखाण माझे नसते ही बाब विनम्रपणे (कुठलाही मोठेपणा न घेता) मी येथे कबुल करत आहे.
(त.टीप: प्रस्तुत लेखात शुद्धलेखनाच्या किंवा मराठी व्याकरणाच्या काही चुका असू शकतात त्या चुका किबोर्ड च्या आहेत असे सुज्ञ वाचकांनी समजावे शिवाय त्या चुका मनातल्या मनात दुरुस्त करून वाचाव्या. )
©सुधीर वि. देशमुख
अमरावती
०२/०८/१८

8 comments:

  1. Superb, keep writing....

    ReplyDelete
  2. फारच छान.....मन मोकळपणे लिखाण केले ....उत्तम

    ReplyDelete
  3. सुधीर, आज मी तुझे लिखाण खरच पूर्ण वाचले, खूप छान लिहितोस, भरपूर लिही, ओथंबून लिही, मुसळधार लिही, झोकून लिही,भरभरून लिही,आकंठ बुडून लिही तुझा लिहिण्याचा व्यासंग असाच व्यसनासारखा चालू राहू दे, तुला तुझ्या लिहिण्याकरिता मनापासून, भडभडून शुभेच्छा मित्रा,

    ReplyDelete

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...