डावखुरा हा जन्मतःच डावा असतो त्यासाठी खरतर वेगळं काही करावं लागतं नाही. फार सोपं असत डावखुरा होणं, पण डावखुरा होऊन जगणं मात्र तेवढंच कठीण. शाळेत एका डेस्क बेंचवर तीन मुलं बसायची शेजारच्या मुलाचा हात सतत लागायचा त्यामुळे लिहण्यास सतत त्रास होत होता. हॉकी खेळायला गेलो तर हॉकी उजव्या बाजूने खेळता येईल अशी डिजाईन केलेली, कात्री वापरायला गेलो तर परत तीच समस्या. क्रिकेट खेळतांना मात्र जरा भाव मिळायचा. आपल्याकडे डाव्या हाताला विशेष कामासाठी न वापरण्याची परंपरा आहे, प्रसाद घेण्यासाठी डावा हात समोर केला तर लगेच हटकतात. एकीकडे टाळी एका हाताने वाजत नाही म्हणायचं आणि दुसरीकडे डाव्या लोकांना सावत्र वागणूक. मी जवळजवळ सातव्या वर्गात पोहचे पर्यंत डाव्या हातानेच जेवण करायचो नंतर पंगतीत जेवतांना फार त्रास होत होता विशेषतः ग्रामीण भागात. हळूहळू काही ठराविक कामे उजव्या हाताने व काही कामे डाव्या हाताने करायची सवय केली. पुढे डाव्या लोकांची खूप मोठी संख्या आहे कळलं, एवढंच नाहितर डावे लोकं सर्जनशील वैगरे असतात असेही कळलं, खरं खोटं देव जाणे. एखादा आयुष्यभर पंचर जोडणारा, दरिद्रीत जीवन जगणारा, व्यक्ती ज्यावेळी बरकत होणार नाहीच्या भीतीने डाव्या हाताने पैसे घेत नाही त्यावेळी मात्र फार वाईट वाटतं, मग हटकून त्यांना उजव्या हाताने पैसे दयावे लागतात. आयुष्यभर असा बरकतचा नियम पाडणारा हा अजूनही एवढा दारिद्री कसा? हा विचार मनाला भेडसावत राहतो. आज जागतिक डावखुरा दिवस आहे म्हणतात, आपलाही एक दिवस येईल
असं वाटलं नव्हतं. तर जागतिक डावखुऱ्या दिवसाच्या माझ्या सारख्या डाव्या (हाताने )लोकांना हार्दिक शुभेच्छा.
Friday, 28 August 2020
डावखुरा
'शांत न होणारी धग'
उद्धव शेळके यांची 'धग' ही कादंबरी मराठी साहित्यातील क्लासिक आहे. विदर्भाच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर असलेली ही कादंबरी एका सामान्य स्त्रीच्या असामान्य संघर्षमय जीवनाचा शोकांतिक प्रवास आहे. मी फार पूर्वी पंधरा एक वर्षांपूर्वी ही कादंबरी वाचली होती, त्याच वेळी ही कादंबरी मनात जागा करून गेली. त्यानंतर अलीकडेच ही संघर्षमय जीवनगाथा वाचली, अनेक दिवस मन या कादंबरीतून बाहेर निघत नव्हते. वाचता वाचता कधी आपण कौतिकच्या जीवनाशी समरस होतो कळत नाही. एक एक पात्र आपल्या देखत संवाद साधत आहे असा भास झाल्याशिवाय राहत नाही. ही ग्रामीण भागातील एका स्त्रीची धगधगती कहाणी वाचून झाल्यावर मी अनेक दिवस अस्वस्थ झालो होतो, काही केल्या कौतिक डोक्याच्या बाहेर निघत नव्हती. कादंबरीतला एक एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता. कौतिकची धळपड, वेदना, परिस्थितीशी दोन हाथ करतांना होणारी फरफट, आपलीच असावी एवढी सच्ची ही कादंबरी आहे. कौतिकच भूत सहजासहजी उतरत नव्हतं. आपल्या फाटक्या संसाराला ठिगळं लावण्यासाठी धावणाऱ्या अनेक स्त्रिया अवती भवती दिसतात, तेव्हा कौतिकची आठवण आल्याशिवाय राहात नाही. संसाराची विलक्षण ओढ निसर्गाने स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त दिली असावी,कर्ता पुरुष बेजबाबदार पणे वागला तर संसाराचा भार स्त्रीच्या खांद्यावर येतो. आत्महत्या केलेल्या पुरुषाची स्त्री त्याच्या नंतर आपल्या मोडक्या तोडक्या प्रपंचाचा गाढा ओढतेच ना.
'धग' ही शिंपी समजातील महादेव व कौतिकची
कथा असली तरी कथेची नायिका कौतिकच आहे. तिच्या माहेरची लोकं, तिचा सासरा रघुनाथ शिंपी, तिची मुलं भीमा, नामा, यसोदा, तिचे शेजारी सीता, सुकदेव नंतरच्या काळात ती ज्यांच्या घरी राहते ते कासीम व सकिनाचं कुटुंब इत्यादी सर्व पात्र आपल्या समोर लेखकाने सहज उभी केली आहे. बहुतेकांनी ही कादंबरी वाचली आहे, अनेकांनी अभ्यासली आहे, यावर भरभरून लिहलेले आहे. उत्कृष्ट साहित्याचा अस्सल नमुना ही
कादंबरी आहे , ज्यांनी अजूनही वाचली नसेल त्यांनी 'धग' अवश्य वाचावी.
सुधीर वि. देशमुख
अमरावती
२९/०८/२०२०
Thursday, 23 July 2020
ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता
प्रातिभावन्त लेखक वि. स. खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं हे गीत त्यांचीच पटकथा असलेल्या 'माणसाला पंख असतात' या १९६१ साली आलेल्या आशयघन चित्रपटातील आहे. सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या प्रेमपटातील हे गीत, आस्तिक तथा धेय्यवादाचे पुरस्कर्ते असणाऱ्या खांडेकरांच्या दैवी प्रतिभेचा विलक्षण अविष्कार आहे. चित्रपटातील नायक कवी असून हे गीत म्हणजे त्याची 'बेट' कविता आहे. एका प्रसंगात नायिका कवितेचा अर्थ विचारते त्यावेळी नायक तिला सांगतो ही कविता म्हणजे सामाजिक दृष्ट्या वंचीत असणाऱ्या समाजाची आर्जव आहे. बेटरुपी या वंचितांची समाजरूपी समुद्राला ही हाक आहे, त्यांना जवळ घेण्याची, त्यांचे हक्क त्यांना देण्याची.
ये जवळी घे जवळी
प्रिय सखया भगवंता
वेढुनि मज राहसि का
दूर दूर आता
रे सुंदर तव तीरी
जग हिरवे धुंद उरी
पातेहि न गवताचे
शोभवि मम माथा
निशिदिनि या नटुनि थटुनि
बघ नौका जाति दुरुनि
स्पर्शास्तव आतुर मी
दुर्लभ तो हाता
मीना मंगेशकर अर्थात मीना खडीकर यांनी या गीताला एकदम भारी चाल दिली आहे. लता दिदींचं एवढं सुंदर गाणं त्यांच्या इतर मराठी क्लासिक गाण्यांसारखं प्रासिद्ध का नाही झालं याचं नवल वाटते. उषा किरण या बोलक्या डोळ्याच्या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं हे गीत नेत्राला व कानाला अप्रतिम भेट आहे. हे गीत ऐकतांना नकळत चोखामेळा सारख्या संतकवीने भगवंतांला आपल्या अभंगातून दिलेल्या आर्त हाकेची आठवण येते.
चमचमती लखलखती
तव मंदिरी दीप किती
झोपडीत अंधारी
वाचु कशी गाथा
खाली लिंक दिली आहे अवश्य आनंद घ्या.💐
सुधीर देशमुख
अमरावती
२४/७/२०२०
https://youtu.be/hKNSU4e3Pp4
Wednesday, 22 July 2020
जागून ज्याची वाट पाहिली !
सुधीर वि. देशमुख
Friday, 20 March 2020
"ब्युटी मागची सत्यकथा!"
अलीकडच्या लग्नात सुगीचे दिवस जर कोणाला आले असेल तर ते म्हणजे केटरिंग, फोटोग्राफर, ब्युटीपार्लर या व्यवसाईक वर्गाला. या शिवाय इतरही छोटे मोठे घटक आहेतच जसे फेटेवाला, घोडेवाला, बँडवाला, मेहंदीवाला इत्यादी. पणखास करून ज्या तीन घटकांना जबरदस्त महत्व आलं ते म्हणजे केटरिंग, फोटोवाले व ब्युटी पार्लरवाल्या लोकांना. यावर फोटोग्राफीवर मी पूर्वी लिहेलच आहे, केटरिंग स्वतन्त्र विषय आहे. ब्युटीपार्लर वर काही बोलूया . अलीकडच्या भागात शहरी, मध्यम शहरी भागात जबरदस्त तेजीत आलेला हा व्यवसाय आहे. लग्नात तर या व्यवसाईकांना प्रचंड मागणी आहे. पूर्वी राणू मंडलचा बदललेला लुक व्हायरल झाला होता तेव्हा पासून माझ्या मनात यांच्या विषयी प्रचंड आदर निर्माण झाला आहे (भीतीयुक्त नाही बरं), लग्नात नवरीचे मेकअप करून देणाऱ्या पार्लर वाल्या, हल्ली त्यांना ब्युटीशीयन म्हणतात म्हणे, काय ते त्यांचे कौतुक. सध्या पॅकेजचा जमाना आहे, काय दिवस आले, उद्या एखादा माणूस गेल्यावर म्हणजे देवाघरी गेल्यावर त्याचा मरणोत्तर सर्व विधी करून दयायचे पण पॅकेज येईल. (फार मोठ्या शहरात सध्या आहे म्हणतात) "तुम्ही फक्त मरा पुढचं आम्ही बघतो" अश्या त्या कंपन्या जाहिरात देखील करतील. मग रडण्याच्या कार्यक्रमापासून तर मृताच्या न पाहिलेल्या आत्म्याला थेट स्वर्गात जागा मिळून देण्यापर्यंतच सर्व सेटिंगचा दावा या कंपन्या करतील. त्यातही स्वर्गात कुठे जागा द्यायची, म्हणजे जिथे अप्सरा इत्यादी इत्यादी असतात तिथला रेट जास्त. हल्ली मोठ्या शहरात जिवंतपणी राहायला जागा मिळत नाही, मेल्यावर थेट अप्सरांच्या दरबारातच जागा भेटत असेल तर मरणाऱ्याने भरपूर माल जमा करून ठेवावा, नंतर उत्तराधिकार्या मार्फत या कम्पनीच्या पॅकेज वर खर्च करावा. तर आपला मुद्दा ब्युटीशीयनच्या पॅकेजचा होता. तीनचार दिवस चालणाऱ्या लग्न कार्यात नवरीच्या वेगवेगळ्या दिवसाच्या मेकअपचं पॅकेज असते. पन्नास हजारांपासून तर लाखापर्यंत म्हणजे नवरीला किती बदलून टाकावे यावर रेट ठरत असावे कदाचित. एकदा मी माझ्या एका परिचित मुलाच्या लग्ना नंतरच्या सत्यनारायणच्या कथेला गेलो होतो. सत्यनारायणच्या कथेला लग्नात विशेष महत्व आहे, लग्न झालेल्या तमाम लोकांना माहीत आहेच. तर घरातील म्हाताऱ्या बाया सोडल्या तर इतर फारसं कथेला कोणी दिसलं नाही. घरातील काही मंडळी कामात होती, काही पाहुनी सेल्फी काढत होती तर काही लग्नात काढलेल्या सेल्फी पाहण्याचे महत्वाचे काम करत होती. नंतर स्थानिक पाहुण्यांची हळूहळू गर्दी वाढली पण ती कथेसाठी नसून त्यानंतरच्या जेवणासाठी होती, हे मी पटकन हेरलं. माझा वेळचा अंदाज चुकला म्हणून मला कथेला सामोरे जावं लागलं होतं. सांगायचा मुद्दा म्हणजे सत्यनारायणाच्या कथेत बसलेली नवरी व मी लग्नात पाहिलेली नवरी एकदम वेगळी वाटत होती, तसं आपल्याला दुसऱ्याच्या बायकोत कशाला इंटरेस्ट. पण लग्नातली वधू व या मुलाच्या बाजूची वधू कुठेही एकसारखी दिसत नव्हती. नवरा मुलगा मात्र तोच असल्याची मी परत खात्री करून घेतली. दोनदिवसात काय झाले कळत नव्हते. विशेष म्हणजे स्वागत समारंभाला पण ही मुलगी नव्हती, मग या गड्याने दोन दिवसात नवीन आणली कुठून ? कसं काय जमतं बुवा यांना ? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात लॉगइन करत होते. सत्यनारायण झाल्या शिवाय जेवण सुरू होणार नव्हते त्यामुळे विचार करायला वेळ होता, म्हणून विचार करत होतो, नाहीतर आपण आजिबात दुसऱ्याच्या भानगडीत पडत नाही. आणि एकदम 'रोणू मंडल' आठवली अरे लेक या ब्युटीशीयनच्या हाताची तर नाही ना ही जादू ? म्हणजे श्रीमंती पूजन, हल्ली हा पण वेगळा इव्हेंट आहे, (फक्त श्रीमंत लोकच हा कार्यक्रम करतात म्हणून याला श्रीमंती पूजन म्हणत असावे असे मला पूर्वी वाटायचे. ) लग्न व रिसेप्शन इथपर्यंतच या ब्युटीशीयनचा काँट्रॅक्ट होता तर (ठेका म्हटलं असतं पण चांगलं वाटत नाही, बांधकाम करणारे ठेकेदार ठेका घेतात, पण ब्युटीशयनाला कसं ठेकेदार म्हणावं तसे तेही चेहऱ्याची बांधणी करूनच देतात म्हणा.) हळूहळू मला चित्र व नवरीचा चेहरा स्पष्ट होत गेला. म्हणजे मेकअपच्या मागच्या नवरीचे आजचं सत्यनारायणाच्या निमित्ताने सत्यदर्शन झाले तर. म्हणजे पूर्वी वधू पडद्यात राहायच्या म्हणे , हल्ली मेकअपच्या मागे राहतात. असो आपल्याला काय जेवण सुरू झाले व मी विचार मंथनामुळे आलेल्या श्रमाचा बदला जेवणाचा समाचार घेऊन घेतला हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल.
Saturday, 14 September 2019
केळीचे सुकले बाग !
विस पंचविस वर्ष झाली असतील, "लता, आशा, उषा" नावाची एक कॅसेट माझ्या वडील भावाने आणली होती. एकूण सहा गाणी असतील त्यामध्ये आता सर्व गाणी आठवत नाही पण "तरुण आहे रात्र अजूनही" व "केळीचे सुकले बाग" हे दोन गीतं होती त्यामध्ये पहिलं आशा ताईचे तर दुसरे उषा ताईचे. ही दोन गाणी सोडली तर त्या कॅसेट मधली इतर गाणी आता नीटशी आठवत नाही. 'तरुण आहे रात्र अजूनही' नंतर अनेक वेळा ऐकण्यात आलं, परंतू 'केळीचे सुकले बाग' नंतर कधी ऐकलय असे आठवत नाही. ज्यावेळी लतादिदी व आशाताई जास्तीत जास्त हिंदी चित्रपट गीत गात होत्या त्याच काळात उषा ताईने खास मराठी चित्रपटा साठी अनेक गीतं गाईली. दोघी बहिणी मातब्बर गायिका त्यामुळे उषा ताई कडे कदाचित बऱ्याच रसिकांचे लक्ष जात नाही. काल अचानक युट्युब वर "केळीचे सुकले बाग" परत ऐकलय. त्यावेळी त्याचा फारसा बोध झाला नव्हता, आता मात्र हे गाणं एकदम मनाचा ठाव घेतय. तसा आताही पूर्ण बोध झाला असे ठाम सांगता येत नाही.
केळीचे सुकले बाग असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पानं असुनि निगराणी
आपल्या नजरे समोर अनेक वेळा होत्याचे नव्हते होते. पाहता पाहता अचानक एखादी जवळची व्यक्ती दूर अनंताच्या प्रवासाला निघून जाते, काही कळत नाही, नेमकं काय झालं ते. येणारी रोजची सकाळ तिच्या गर्भात काय गुपितं घेऊन येईल कुणास माहीत? हा जगण्याचा प्रवास असाच अनिच्छितता घेवून सुरू राहतो, आपले कितीही लक्ष असुद्या जीवनावर. अनाकलनीय अश्या अनेक घटना अवती भवती सुरूच असतात. कितीही का निगराणी असू दे पण केळीचे बाग सुखले शेवटी पर्यायाने केळीचे प्राणही सुखले.
किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण बघुनि भवताली.
आता जीवाला नेमकी कशाची ओढ लागलेली आहे? कुठल्या गोष्टीसाठी मन असे भाव विभोर झालेले आहे? कुठली कळ काळजात सल करत आहे?
अशि कुठे लागली आग जळती जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे
ही कविता ऐकतांना ग्रेस यांच्या 'भय इथले संपत नाही' ची आठवण येते. "केळीचे" हा शब्द गातांना उषा ताईने असा स्वर लावला की त्या सुकून भग्न झालेल्या बागेचे दुःख केव्हा आपले होते ते कळत नाही.
किती दूरचि लागे झळ आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा
कवी 'अनिल' यांच्या आशयघन कवितेला चाल लावली 'देव' माणसानी अर्थात 'यशवंत देव' यांनी. खाली गाण्याची लिंक दिलेली आहे अवश्य ऐका.
सुधीर वि. देशमुख
अमरावती
रविवार 15/09/19
https://www.youtube.com/watch?v=urkKbm2ePtQ
Saturday, 24 August 2019
तो तसा घाईत नव्हता !
मी कधी काळी तिच्याही यौवनाचे गीत होतो
मीच आहे नाव आणि मीच आहे भोवरा
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला
सांग मग तो कोण होता जो शहर सोडून गेलाआता जाब विचाराव, प्रश्न करावे, तर काय होईल ते टाळलेच जातील, आणि मग कितीही खुलाशे झाले तरी त्याला अर्थ काय.
की खुलाशांचाच सार्या अर्थ मग बदलून गेला
सुधीर वि. देशमुख
अमरावती
रविवार २५/०८/१९
https://www.youtube.com/watch?v=r_GefvI-Yes
दे रे हरी.....
मागे एकदा मी आमच्या शहरातील आळशी लोकांची बैठक बोलावली होती. सभेला एकही आळशी आला नाही. सभेला एकही आळशी नसल्यामुळे मलाच स्वतःला सभा घ्यावी ला...
-
" सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझीच मी वाट पाहात आहे अजूनही वाटते मला अजूनही सांज रात आहे ." कवी सुरेश भट यां...
-
# दुभंगलेली_घरे आज दुकानात पनीर घ्यायला गेलो तिथे काकाही आले होते. मी पनीर घेतलं व काकाने दही. काका एकदम रोड झाले होते, खांदे झुकली होत...
-
मागे एकदा मी आमच्या शहरातील आळशी लोकांची बैठक बोलावली होती. सभेला एकही आळशी आला नाही. सभेला एकही आळशी नसल्यामुळे मलाच स्वतःला सभा घ्यावी ला...




