Wednesday, 1 August 2018

माझी साहित्यगिरी

लिखाणाची आवड मला फार म्हणजे फारच पूर्वी पासून आहे. काही लोकं याला कुत्सितपणे खोड म्हणतात.(पण लिखाण हे माझ्या खोडात नसून मुळातच आहे.) माझ्या एका दूरच्या मावशीनुसार मी पहिले लिहू लागलो व नंतर बोलू लागलो. काही वाचकांचा या बाबीवर विश्वास बसणार नाही, ही बाब वेगळी परंतु लेखन करणाऱ्याने नेहमी सत्याचाच पदर धरावा भलेही तो पदर कितीही जीर्ण असला तरी. सुरवातीला वर्तमानपत्र, नियतकालिक असे करता करता मी अलीकडे आजचे आधुनिक समाज माध्यमे जसे फेसबुक व व्हाटसअॅप वर लिखाण करू लागलो. इतर माध्यमांपेक्षा ही आधुनिक माध्यमे वेगळी असल्यामुळे मला सुरवातीला फार निराशाजनक अनुभव आला, परंतु त्यावर मी कसा तोडगा काढला इत्यादी गोष्टी मी आज आपल्या सोबत शेयर करणार आहे. वास्ताविक मला अनेक वाचकांकडून तसा आग्रहच झाला आहे , नाहीतर ही बाब मी कोणालाही सांगणार नव्हतो. अर्थात काही कुत्सित वाचकांना ही बाब बतावणी सुद्धा वाटू शकते, पण त्याला माझा इलाज नाही. फेसबुक व व्हाटसअप वर प्रकाशित झालेले (अर्थात ते मी स्वत:च प्रकाशित करत होतो.) माझे लिखाण फारसे कोणी मनावर घेत नव्हते, वाचत नव्हते, त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मी फार बेचैन झालो होतो, अस्वस्थ झालो होतो, काय करावे मला काही समजत नव्हते. आपले नेमके काय चुकते आहे, काहीच कळत नव्हते. दर्जाच्या बाबतीत म्हणाल तर व्हाटसअॅप वर फास्ट फारवर्ड होणाऱ्या इतर लीखाणापेक्षा माझे लिखाण कुठेही कमी नव्हते. कोणी वाचतच नसल्यामुळे लिखाण कसे वाटले हे विचारण्याचीही सोय नव्हती. आपली साहित्य सेवा व्यर्थ वाया जाताना पाहुन माझे हृदय भयंकर कासावीस व्हायचे. त्या घनघोर दुःखात माझ्याकडून अधिक दोनचार कविता प्रसूत व्हायच्या. साहित्यिक साहित्य प्रसूत करत असतो, प्रसूतीच्या कळा काय असतात त्या साहित्य निर्माण करणार्याला माहीत असतात. बर्याच वेळा तर सिजर करून साहित्यिकअपत्ये प्रसूत करावी लागते. कधी कधी हे सीजर वारंवार होत असल्यामुळे बरीच अपत्ये अपुर्या दिवसाची किंवा कुपोषितच जन्म घेतात. माझ्या या प्रसूत झालेल्या कवितांचे नशीब जन्मापूर्वीच ठरले असाल्यामुळे दुसरे काय होणार?इतर लिखाणाप्रमाणे या कावितांच्याही वाटेला फारसे कोणी जात नव्हते. लिखाणाला अधिक व्याप्ती मिळण्याच्या दृष्टीने मी काही हौशी लेखकांच्या एक दोन व्हाटसअॅप समूहामध्ये प्रवेश केला. (लिखाणाला खोली नसले तर चालते पण व्याप्ती ही असावीच लागते.) परंतु त्यामध्ये सर्व लेखकच असल्यामुळे कोणी वाचत नव्हते. सर्व भराभर लिहणारे. आपण आपली एक कविता पोस्ट केली की लगोलग इतर सर्व आपली कविता सोडून लगेच सूड घ्यायचे. नंतर मी खास व्हाटसअॅप वाचकांचा ‘आम्ही हौशी वाचक’, 'वाचाल तर वाचाल', 'वाचे त्याचे काम ना नाचे', 'वाचणार तोच लिहणार' नावाचे काही समूह प्रवेशित केले. यां समूहांमधे लीहणारे जरी कमी असले तरी फारवर्ड करणारे भरपूर होते. मी ऐक कविता पोस्ट केली रे केली की लगेच एकच व्यक्ती चार चार कविता फारवर्ड करून मला नामोहरण करायचा. मी आजिबात नाउमेद झालो नाही. नंतर मी बालवाडीच्या पासून तर पीएचडी पर्यंतच्या मित्रांचे वेगवेगळे व्हाटसअॅप समुह, जसे सकाळी फिरायला जाणाऱ्यांचा , फिरायला न जाणाऱ्यांचा , कार्यालयातील मित्रांचा , रोज रेल्वेने अपडाऊन करणाऱ्यांचा, मुलांच्या शाळेतील पालकांचा , स्कुलबस मधील मुलांच्या पालकांचा , मुलं शिकवणीला जातात तेथील मुलांच्या पालकांचा , आम्ही नेहमी जिथे चाट खातो तिथेच चाट खाणाऱ्या खवय्यांचा , जिथे गाडी दुरुस्त करतो, कटिंग करतो त्या ग्राहकांचा , वेगवेगळ्या थोर व्यक्तींना मानणाऱ्या व्यक्तींचा , कुंभ राशींच्या लोकांचा , ऑक्टोबर महिन्यात जन्म घेतलेल्या , एवढेच काय आमची कामवाली ज्या ज्या घरी जाते त्या घरातील सदस्यांचा , मधुमेह असणाऱ्या व्यक्तींचा (मला मधुमेह नाही पण माझ्या वडिलांना हा आजार असल्या मुळे मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून या समूहात आहे.या समूहाचे नाव 'साखरेचं टाळणार त्याचा यम टळणार' असेे आहे.) याशिवाय माझ्या नातेवाईकांचा, पत्नीच्या नातेवाईकांचा , जातीचा, पोट जातीचा असे ऐकून ऐका समूहांमध्ये मध्ये साहित्य फिरवण्याचा प्रयत्न केला परंतू प्रातिसाद शून्य. यातील बऱ्याच समूहांचा मी स्वतःच समूह संचालक आहे हे आतापर्यंत चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच व मी कुठल्या उदात्त भावनेने हे समूह सुरू केले हेही ओळखले असेल.
आपले लेख नाना पाटेकर, विश्वास नागरे पाटील, प्रकाश आमटे इत्यादी महनीय व्यक्तींच्या नावे पाठवावा असा ऐक स्वप्रसिद्धीचा त्याग करणारा महान विचार माझ्या डोक्याला स्पर्शून गेला परंतु तो विचार फक्त स्पर्शुनच गेला आंत मध्ये न गेल्यामुळे मी तो विचार बाजूला ठेवला ( तसेही या तिघांच्या नावे एवढे लेख फारवर्ड होत असतात की त्यांची साहित्य संपादा आता त्यांनाही कळेेनासी झाली आहे. मध्ये मध्ये तर शेतीशास्त्र किंवा पाकशास्त्र यां विषयांची माहिती सुद्धा काही सुपीक डोके यांच्या नावाने फारवर्ड करतील का? अशी भीती मला वाटायची.) मधल्या काळात हा लेख वाचून फारवर्ड केल्यास २ gb डाटा फ्री, किंवा बॅटरी फुल, जमा झालेले व नकोशे असलेले सर्व फोटो आपोआप डीलिट(आपोआप जमा होतात तसे) अश्या तळटीप टाकायच्या, असा विचार देखील आला, परंतु विज्ञानवादी लोकं आक्षेप घेवून आपले अज्ञान उघडे पाडतील हा दुसरा विचार माझ्या डोक्यात आला, व तसे करणे टाळले. आपल्या लिखाणाचा टी. आर. पी. वाढवन्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते आणि अचानक मला ऐक शक्कल सुचली. मी माझ्याच लिखाणातील माझे नाव काढून, लेखकाचे नाव माहीत नाही पण ज्यानेही लिहले जबरदस्त लिहलय, लेखक कोण आहेत माहीत नाही पण ज्यानेही लिहले त्याला 21 तोफांची सलामी, (ही सलामी नंतर मी वाढवत वाढवत 100 तोफांपर्यंत नेली आहे.) अतिशय महत्वाचा लेख शेवट पर्यंत वाचा, शेवटपर्यंत वाचल्यास आपण शेयर केल्याशिवाय राहणार नाही, फारवर्ड अज रीसिव्ड, असल्या टीपा लिखाणाच्या सुरवातीला टाकने सुरु केले. काय चमत्कार मी हा विकल्प सुरु करताच माझे लीखाण विविध समुहात फिरणे सुरु झाले. माझे लिखाणावर बर्याच कॉमेंट, लाईक, शेयर सुरु झाले. आपले लीखाण अनारौस होऊन का होईना गुण्या गोविंदाने सोशिअल मिडियावर नांदते आहे यांचे मला मनस्वी समाधान मिळू लागले. अर्थात सर्वच निनावी करून फिरणारे लिखाण माझे नसते ही बाब विनम्रपणे (कुठलाही मोठेपणा न घेता) मी येथे कबुल करत आहे.
(त.टीप: प्रस्तुत लेखात शुद्धलेखनाच्या किंवा मराठी व्याकरणाच्या काही चुका असू शकतात त्या चुका किबोर्ड च्या आहेत असे सुज्ञ वाचकांनी समजावे शिवाय त्या चुका मनातल्या मनात दुरुस्त करून वाचाव्या. )
©सुधीर वि. देशमुख
अमरावती
०२/०८/१८

Friday, 1 June 2018

घर थकलेले सन्यासी'घर पाहावे बांधून व लग्न पाहावे करून' असे उगीच नाही म्हटल्या जात, दोन्ही कामाचा अनुभव लक्षात राहील असाच असतो.  'मला घर बांधयाचे आहे' असे म्हणनारे अनेक जण अधुन मधून भेटत असतात.

'खेड्यामधले घर कौलारू' असे आता म्हणता येणार नाही.  त्याचेही स्वरूप आता बदलत आहे. पूर्वी मातीची घरे असायची, त्याची जागा आता मजबूत सीमेंट कांक्रीट च्या घराने घेतली आहे. प्रत्येक घर असे आपले वैशिष्ट जपत असते. माझे लहानपण अगदी छोट्या आकाराच्या सरकारी घरात गेले. अगदी खेटून खेटून बांधलेली चाळी सारखी घरे होती ती. सर्व घरे सारखी तरी प्रत्येक घराचे आप आपले वेगळेपण आसायचे. काही घरात सहज जाता येत असे, त्याला काही वेळेचे बंधन नसायचे, केव्हाही जा घरातली लोक आपलिच वाटायची, परकेपणा अजिबात नाही. या घरात नेमकी जेवणं सुरु असताना गेलो तर, जेवण करण्यासही संकोच वाटत नसे. कधी कधी तर आपल्या घरचा असेल नसेल तो स्वैपाक घेवून एकदम दोन तिन घरची मुले सोबत जेवत असे.

काही घरे मात्र प्रचंड रहस्यमय असायची त्या घरात कोणी फारसे जाण्यास धजावत नसे. अश्या घरात बाहेरून येणारी पाहुने मंडळी सुद्धा बेताचीच असायची. बहुतेक वेळा अश्या घरचा मुख्य दरवाजा बंद असायचा. अश्या घरात लहान मुले देखील मोजकिच असायची. ही मुले बाहेर खेळायला फारशी येत नव्हती. विशेष वाटनारी ही मुले विशेष वातावरणातच ठेवली जायची. अश्या या वेगळ्या वाटणाऱ्या घरात फार तर गणपतीच्या किंवा होळीच्या वर्गणीसाठी आम्ही जात असो. हे घर आतून अतिशय नीट नेटकं असायचं. घरातील मूल घरात देखील खेळत नाही का, असे मला बहुतेक वेळा वाटायचे. अगदी आखिव रेखीव माणसे तसेच त्यांचे आखिव रेखीव घर. अश्या घरातून कधी एकदाचे बाहेर पडतो असे वाटायचे. याउलट काही घरात मात्र सतत येणाऱ्या जाणार्यांचा राबता असायचा. बहुतेक गावाकडची  नातेवाईक मंडळी येत जात राहायची.

 काही घरी गेल्यावर चहा-पाण्याचा आग्रह होतो. अश्या घरात मी चहा कॉफ़ी काहीच पित नाही असे म्हणनारा पाहुना गेला तर घराला फार वाईट वाटते. घरी आलेला पाहुना काहीच न घेता गेला याची रुखरुख घरात जाणवते. काही घरात अगदी औपचारिकता म्हणून चहा विचारला जातो, हे सहज ओळखता येते. अश्या वेळी कितीही मूड असला तरी 'हो घेतो चहा' असे कदाचितच कोणी म्हणेल.

'दारा बांधता तोरण घर नाचले नाचले' असे अगदी बरोबर म्हटले आहे. मंगल कार्य असणाऱ्या अश्या घराचा पदरच वेगळा असतो. हे घर इतर घरांपेक्षा चटकन लक्षात येतात. ग्रामीण भागात अश्या घराला लगन घर म्हणतात. त्या काळात मग मी अमक्या अमक्या च्या घरी चाललो असं कोणी म्हणत नाही. सरळ लगन घरी जातो असे म्हणायचे. अश्या मंगल कार्य होऊ घातलेल्या घराला अचानक आनंदाचे उधान आलेले असते. घरात येणाऱ्या जाणाऱ्या मंडळीचा राबता वाढलेला असतो. रात्री उशीरा उशीरा  पर्यन्त गप्पा  रंगलेल्या असतात. जेवनाच्या मेनू पासून तर पाहूनांच्या यादी पर्यन्त चर्चा रंगते. माना-पानाचे ठरवले जाते. अनेक जुन्या आठवणी निघतात पूर्वी झालेली  चूक आता मात्र  होऊ द्यायची नाही असे ठरवल्या जाते. घराच्या भिंती हे सर्व अनुभवत असते. गेल्या कित्येक दिवसांपासून तरुण मुलीच्या लग्नासाठी पित्याने केलेली पायपीठ त्या घराने पाहलेली असते. त्याकाळात घर काळजीने ग्रासलेले असते. शेवटी मनात असल्या प्रमाणे सोयरिक होते व  तो मंगल सोहळा अनुभवन्यासाठी घर उभे राहतेे. काल पर्यन्त मनासारखा सोयरा मिळालेला असल्यामुळे खुश असणारा पीता मात्र, जस जशी कार्याची तारीख जवळ येते तस तसा उदास होत जातो. घरातल्या एखद्या कोपर्यात  तो आपल्या आसवानां वाट मोकळी करून देतो. घरतल्या त्या पित्याची घालमेल फक्त घरालाच माहीत असते. एवढेच नाही तर त्या घराच्या अंगा खांद्यावर वाढलेली "ती" उद्या पासून तीथली पाहुनी होणार हे त्या घराला माहीत असते. घर हे सर्व मुकाट्याने अनुभवत असते.
घराने अनेक उन्हाळे पावसाळे सोसलेले असतात. घराचाही ऐक ऐक काळ असतो काल पर्यन्त एकसंघ असणार घर दुभंगल्या जाण्याची वेळ सुद्धा अनेक घरांवर येते. परस्परांवर विसंबून असणारी मुले, जाणती होतात. त्यांच्या पंखांमधे बळ निर्माण होते. या घरात आपल्या स्वप्नांचा कोंढमारा होतो, असे त्यांना अचानकच वाटू लागतें. बऱ्याच वेळा अहंकारमुळे घराच्या भिंती कोलमोडू लागतात. ज्यांचे बालपण त्या घराने अनुभवलेले असते तेच अचानक बंड करू पाहतात, ऐकिनाशी होतात, घर हतबल होते, उदास होते. अश्या घराला कितीही रंगरंगोटी केली, सजवले, तरी घरातली उदासी मात्र जात नाही. अश्या घरात पाय  ठेवल्याबरोबर घरातला भकासपणा सहज जाणवते.

घर काही दगड विटा रचून तयार झालेली इमारत नसते, घराला 'घरपण' असते तसे इमारतीला नसते. अशी घरपण नसणारी घरे व विश्रामगृह मध्ये फारसा फरक राहत नाही.

का का बरं पण जेव्हा पासून घराच्या भोवताली असणाऱ्या सुरक्षा भिंतीची उंची वाढली, घरातल्या टिप्या, मोती,खंड्याची जागा मॅंक्स, जॅकी, टफी इत्यादींनी घेतली तेव्हापासून घर पूर्वी सारखी परिचित वाटत नाही.

©सुधीर वि. देशमुख
    अमरावती
01/06/18

Monday, 21 May 2018

वेडिंग फोटोग्राफी एक गम्मत


हल्ली लग्न लागल्यावर ती नवरा आणि नवरी फोटोग्राफर च्या ताब्यात द्यावी लागते, पाहुण्यांना त्यांच्याशी न बोलायची सोय ना शुभेच्छा द्यायची. अशा वेळी पाहुण्यांची नजर जेवणाकडे नाही वळली तर नवलच. तरी बर प्रीवेडिंग फोटोग्राफी आधीच काढून झालेली असते. प्रीवेडिंग फोटोग्राफी हा प्रकार कोणी शोधून काढला त्याला तर एकवीस तोफांची सलामीच दिली पाहिजे (सलामी नेहमी एकवीस तोफांचीच का देतात? गणपतीचा आणि एकवीस आकड्याचा सबन्ध माहीत होता, पण एकवीस आणि तोफेचा काय सबन्ध ? असो आपल्याला काय एकवीस तर एकविसच, तशाही सलामी द्यायला तोफा आहे कुठे?) तर आपण त्या प्रीवेडिंग फोटोग्राफी वर होतो. हल्ली बर्याच बाबी प्रीवेडिंग होतात म्हणून याचीही भरीस भर पडली असावी का? "आमच्या वेळेस नव्हतं बाई असले भलते चाळे" एका लग्नात एक आजी ठसक्यात म्हणाली. चा..ळे ? आजीला फोटोग्राफीचे हे कौंशल्य चाळे वाटत होते. मग आजीच्या घरी पाळणा कसा लांबला होता ? तो एवढा वेळा लांबला होता की, आजोबा पाळणा सतत बांधून ठेवत. एकदा तर एकाच घरात दोन पाळणे एक मायच्या लेकराला व एक तिच्या लेकीच्या लेकराचा. तरी देखील आजी या आधुनिक फोटोग्राफी शास्त्राला चाळे म्हणत होती, त्याचे कारणही तसेच आहे. आजीच्या नातीच्या लग्नात, नातीच्या डोक्यावर अक्षदा पडल्यावर कोणीतरी 'नारायण' टाइप कार्यकर्त्याने आजीला, नातीला व नातजवयाला आशीर्वाद देण्यासाठी स्टेज जवळ आणले होते, पण काय तो दृष्ट फोटोग्राफर त्याने नवरा नवरीचा असा ताबा घेतला की एक तास तरी सोडलेच नाही. कशीतरी त्या फोटोग्राफरच्या तावडीतून सुटका झाल्यावर आजी स्टेजवर जाईल तर मुलाकडच्या फोटोग्राफरने मोर्चा सांभाळला. नवरा मुलगा व नवरीला वेगवेगळ्या पोजेस घ्यायला लावून आता त्याला आपली स्किल सिद्ध करायची होती. नवरीकडचा फोटोग्राफर लहान गावातला हा महानगरातला, त्यात जास्त रेटचा, त्यामुळे नवरी कडच्या फोटोग्राफरने एक तास घेतल्यावर याला जास्त वेळ घेणे आवश्यक होतेच. त्याने दहा पोजेस घेतल्या तर याने पंधारा घेणेच होते. आजी बिचारी, नातीचं व नातजवायचे भावविभोर क्षण असहायपणे उघड्या डोळ्याने सर्वांसमोर पाहत होती, आजी चिडणार नाही तर काय? आजीच काय मुला मुलीला भेटायला आलेले सर्व पाहुणे तातकडत उभे होते पण फोटोग्राफरचे कोणाकडेही लक्ष नव्हतं. अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसायचा तसे याला फक्त नवरा व नवरी.
एक काळ होता नवरा नवरीचा फोटो पाहुण्यांसोबत काढायची रीत होती. (नाही म्हणायला आजही आहे, पण दुय्यम ) आलेल्या पाहुण्यांतला कुणी सुटला तर नाही ना ? अशी काळजी दोन्हीकडच्या यजमानांना राहायची. एखादा 'बालीचा पाहुणा' फोटो काढायचा सुटला तर, केलेल्या सोयीची वाट लागायची. हल्ली मात्र एकदा लग्न ठरले की प्रीवेडिंग शूट पासून सुरू झालेली फोटोग्राफी संपता संपत नाही. तरी बर सेल्फी वैगरे साठी फोन असतातच.फक्त फोटोसाठीच लग्न काढले की काय असे या फोटोंना पाहल्यावर वाटत राहते. हल्ली लग्न झाल्यावर एकदोन महिन्याने कोणाकडे जाण्याचे मी टाळतो कारण गेल्यावर त्या फोटोग्राफरचा पराक्रम चहाच्या घोटासोबत पचवावा लागतो. त्या अल्बममध्ये आपण असण्याची शक्यता कमीच असते, दिसलोच तर एखाद्या कोपर्यात. आणि समजा अल्बम पासून सुटका झालीच तर फेबु आहेच की वेगवेगळी पोजेस पाहायला.
(तळतीप : हा लेख निवळ विनोद निर्माण करण्याच्या उद्देशाने लिहलेला आहे. कोणीही फार गंभीरतेने घेऊ नये, गंभीर वाटल्यास तो दोष लेखकाचा समजावा. )
©सुधीर वि. देशमुख
अमरावती
20/05/18

Thursday, 3 May 2018

आम्हा घरी धन

कविता असो की इतर कुठलं ललित साहित्य, आत मधेच कुठे तरी विस्कटलेले असते. काचाचे विखुरलेले तुकडे एकत्रित करावे व छान कोलाज करावा, तसे हे विस्कटलेले विचारांचे तुकडे एकत्रित करावे व शब्दांच्या मदतीने मोहक शब्दशिल्प तयार करावे. एक एक शब्द विस्कटलेला असला की आपला स्वतंत्र अर्थ घेऊन मिरवत असतो हेच शब्द एकत्रित येतात तेव्हा त्यांचे अर्थ बदलत असतात. संदर्भ बदलला तरी शब्दाचा अर्थ बदलत असतो. अर्थ खरच वाक्यातच असतो का ? की तोही असतो कुठेतरी वाचन किंवा श्रवण करनाऱ्याच्या आत खोल खोल. फेसाळलेल्या पाण्यावर बुडबुडे येतात तसेच विचार नेणिवेतून जाणिवेत येतात. एकदा त्यांनी शब्दांच्या आधाराने मूर्त रूप घेतले की ते स्पष्ट होत जातात. पण नेहमीच व्यक्त होण्यास शब्द सहाय्य करतात का? कदाचित नाही, एखादे अर्थपूर्ण मौन हजार शब्दांचा परिणाम साधते. डोळ्यातून पडलेला एक अश्रू, खांद्यावर ठेवलेला एक हाथ शब्दालाही थिटे ठरवतात. शब्दाची ही मर्यादा आपण समजलो पाहिजे.शब्दाला मर्यादा असून सुद्धा शब्दांची महती कमी नाही होऊ शकत. शब्द खूप वापरले पाहिजे असे अजिबात नाही. मोजक्या शब्दात सुद्धा खूप काही मांडता येते. शब्द जर धन आहे तर ते धना सारखेच वापरल्या गेले पाहिजे. धनाची जशी उधळपट्टी केली की कफल्लकता येते तशीच शब्दांची विनाकारणच उधळपट्टी केली तर व्यक्त होणाऱ्याची महती कमी कमी होत जाते. शब्दांच्या मागे जर चरित्र असेल तर ते शब्द मग मंत्र होतात. प्रामाणिक शब्दच ह्रदयात रुजू शकतात. पोकळ, कोरडे, खोटे शब्द कितीही देखणे असले तरी ते घसरून जातात. मग असे निवळ पल्लेदार वाक्य, आखीव रेखीव भाषा म्हणजे शब्दांची हगवणच (verbal diarrhoea) असते.
'तुका म्हणे पहा शब्दचि हा देव
शब्देची गौरव पूजा करू '.

© शब्दवत्सल सुधीर देशमुख
अमरावती
4/5/18

दुभंगलेली_घरे

#दुभंगलेली_घरे
आज दुकानात पनीर घ्यायला गेलो तिथे काकाही आले होते. मी पनीर घेतलं व काकाने दही. काका एकदम रोड झाले होते, खांदे झुकली होती, गाल आत गेले होते. काकाच्या डोळ्यात कसलेही तेज नव्हते. आवाज एकदम कमजोर झाला होता. मी मुलांसाठी चॉकलेट घेतले होते, त्यातले एक काकाला दिले. काकाने चॉकलेट घेतले, चॉकलेट चे कव्हर काढता काढता काकांचे हात थरथरत होते, मोठया श्रमाने काकाने कव्हर काढले व चॉकलेट खाल्ले. मी अधिक एक चॉकलेट काकाच्या हातावर ठेवले म्हटले मावशीला द्या. त्यांच्या व मावशीच्या तब्बेतीची चौकशी केली तर काकाने कोणाचे औषध सुरू आहे , काय त्रास आहे, मधुमेह बिपी इत्यादी बाबत माहिती दिली.
काका व मावशी काही वर्षांपासून अमरावतीला दोघेच असतात. काकाला निवृत्त होऊन 17 वर्ष झाली असेल. काकाला दोन मुलं, दोन्ही मुलांना काकाने भरपूर शिकवले, त्यांची लग्न केली. सध्या दोन्हीही मुले नोकरीवर आहे एक मुंबईत तर एक पुण्यात.
काकाने मोठया मुलाचे लग्न मोठ्या उत्साहात केले, नंतर त्याला मुलगी झाली, काकाने अमरावतीच्या स्वतःच्या घरी मोठे बारसे केले, नंतर पहिला वाढदिवस केला. मोठया मुलाच्या लग्नानंतरची काही वर्षे मजेत गेली. काका व मावशी कधी अमरावतीला कधी मुंबईला राहत होती.
मधल्या काळात काकांचा लहान मुलगाही चांगल्या नोकरीवर लागला काका फार खुश झाले. मला अधून मधून दिसायचे व तुझे काय सुरू आहे विचारायचे, माझ्याकडे उत्तर नसायचं प्रयत्न सुरू आहे अजून कुठे जमलं नाही ऐकले की काका स्वतःच्या मुलांविषयी सांगायचे. काकाच्या दोन्ही मुलांचे असे कौंतुक मी कित्येकदा ऐकले आहे. मी फारसा काही करत नाही म्हटल्यावर त्यांना फारच जोर यायचा. नंतर मी त्यांना टाळणे सुरू केले, दिसले की काही तरी खवचट बोलतील म्हणून माझा नेहमीचा मार्ग बंद केला. नंतर काकाने लहान मुलाचे लग्न केले, त्याचा मुलगा, त्याचे बारसे वाढदिवस इत्यादी गोष्टी मजेत झाल्या. काका मावशीचे छान सुरू होते, कधी मुंबई कधी पुणे तर कधी अमरावतीला, त्यांच्या घरी.
गेल्या तीन एक वर्षांपासून माञ काका व मावशी अमरावतीलाच असतात. त्यांचे दोन्ही सुनांशी वाद झाले म्हणतात. नेमके कोणाचे काय चुकले माहीत नाही. आता त्यांची मुले मोठी झाली त्यांना आमची गरज नाही असे काका व मावशी सांगतात. तर सासू सासरे नीट वागत नाही त्यांच्या चुकीच्या बोलण्याचा आम्हाला त्रास होतो अशा सुना सांगतात. नेमकी कोणाची चूक आहे माहीत नाही. काकांचा स्वभाव थोडा खवचट आहे ,हे जरी खरे असले तरी त्यांनी मुलांसाठी खूप कष्ट घेतली आहे. आणि अशा म्हातारपणी एकाकी राहणे म्हणजे दुःखदच. काका मुलांकडे ऍडजस्ट नाही झाले किंवा मुलांनी त्यांना सामावून नाही घेतले काहीही म्हणा. काहीही कारण असले तरी आज ज्या स्थितीत ते दोघे अमरावतीच्या घरी एकाकी राहतात ते मात्र चिंताजनक आहे. काकांची दोन्हीही मुले समजदार आहेत त्यांनी आमच्याकडे राहावे असे दोघांनाही वाटते. दोघेही हतबल आहेत मार्ग काय काढावा दोघांनाही कळत नाही. असे एक नाही तर अनेक काका व मावशी बहुतेकवेळा दिसत असतात व मनात अनेक प्रश्न निर्माण करतात.
डॉ. सुधीर वि. देशमुख

Wednesday, 14 March 2018

नियतीला झुंज देणारा शास्त्रज्ञ: स्टीफन हॉकींग


नियतीला झुंज देणारा शास्त्रज्ञ:  स्टीफन हॉकींग

नियतीने वारंवार नामोहरन, हताश, नाउमेद करण्याचे प्रयत्न करावे, जगण्याचे  सर्व बळ हळूहळू संपुष्टात आणावे. सामन्य जीवन जगण्यासाठी लागणारे शरीर  पंगुत्वाने पार कमजोर करून टाकावे, तरी देखील एखाद्याने जगण्याची इच्छा न सोडता त्या अपंग शरीरावरच  नव्हे, तर आपले भविष्य गिळू पाहण्यार्या नियतीवरच मात करावी याचे उदाहरण म्हणजे आधुनिक युगातील थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग. अनेक संकटे आल्यावर देखील कोलमडून न पडता आयुष्याची  दोन हात कसे करावे हे जर शिकायचे असेल तर आपण यांचे चरीत्र  अभ्यासावे. तुम्ही जास्तीत जास्त दोन अडीच वर्ष जगू शकणार असे डॉक्टरांनी सांगीतले, शरीराचे ऐक ऐक अवयव निरुपयोगी होत होते, परंतू यांची जगण्याची इच्छाशक्ती मात्र दिवसेंदिवस  अधिकाधीक प्रबळ होत होती. दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड  आशावाद, काळाशी झुंजणे इत्यादी शब्दसमूहासाठी  कोणी एकच शब्द सुचवायला सांगितले तर स्टीफन हॉकींग यांचे नाव घ्यावे लागेल. आज अचानक त्याच्या निधनाची बातमी कळाली व मन सुन्न झाले.
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म जानेवारी १९४२ या दिवशी  ऑक्सफर्डइंग्लंड  येथे झाला. त्यांचे वडील  डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची  आई इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे होती. घरची परिस्थिती बेताचीच होती, परंतु यांनां लहानपणापासूनच  वाचनाची आवड होती. त्यांनी १९५९ साली वयाच्या १७ व्या वर्षी विश्वशास्त्र (कॉसमॉलॉजी) हा विषय  निवडून ऑक्सफर्ड मध्ये प्रवेश घेतला, त्यासाठी त्यांना स्कॉलरशिप देखील मिळाली होती . १९६२ मध्ये  येथून पदवी संपादन केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी   केम्ब्रिज विद्यापीठात  दखल झाले.   त्यांना  भौतिकशास्त्र , गणित  इत्यादी विज्ञान विषयाची आवड लहानपणापासूनच होती. 
केम्ब्रिज विद्यापीठ येथील शिक्षण अंतिम टप्यात असतांना  काळाने  त्याच्या शरीरावर झडप घातली    एका असाध्य  रोगाने  त्त्यांचा  शरीरात ठाण  मांडले. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. सामान्य जीवन जगणे   जवळजवळ अशक्य  करणारा हा आजार म्हणजेच मोटर न्यूरॉन डिसीज (MND) होय. यालाच  अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे देखील म्हणतात.  हा असाध्य  आजार झाल्यावर स्टीफन  जवळ जवळ ५५ वर्ष  जगले.   ते  निव्वळ  जगलेच नाहीत तर यशाची ऐक ऐक  शिखर पादाक्रांत करत गेले.  
त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून ते  या संगणकावर हवे ते काम करू लागले .  १९८५ साली त्याच्यावर श्वास नलिकेला छिद्र करून एक शस्त्रक्रिया  करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. नंतर  संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली (प्रोग्राम)  लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून  हॉकिंग बोलू लागले, मार्गदर्शन करू लागले. 
स्टीफन हॉकिंग यांनी अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले होते.  स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर (ब्लॅक व्होल) या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आईनसटाईनच्या सापेक्षतावादाची (थेअरी ऑफ रेलॅटिव्हिटी)  जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक  (क्वांटम मेकॅनिक्स) आणि  सापेक्षतावादाची (थेअरी ऑफ रेलॅटिव्हिटी) सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. पुढे  स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला व  त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.
त्यांनी १९८८  साली लिहलेल्या  "ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम" या पुस्तकाने अनेक नव नवे विक्रम प्रस्थापित केले. या पुस्ताकाचे जगभरातील सुमारे   चाळीस भाषेत भाषांतर  झाले असून , ते बेस्ट सेलर म्हणून नोंदल्या गेले आहे. या पुस्तकात त्यांनी कॉस्मॉलॉजी  अर्थात  विश्वाचा आरंभ व विकासआकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात यांचा अभ्यास केला असून,  कॉस्मॉलॉजी  या क्षेत्रात हे पुस्तक अतिशय महत्वाचे ठरले. 
सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज मध्ये ३०  वर्षे त्यांनी  अध्यापन केले आहे. ते वयाच्या ३५ व्या वर्षी  केंब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्रोफेसर बनले व एकेकाळी आयजॅक न्यूटन ज्या खुर्चीवर बसायचे त्या  खुर्चीवर बसू लागले. 
त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ऑक्सफर्ड  विद्यापीठप्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या प्रतिष्टीत विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ रॉयल् असोसीयेशन फोर डीसअबीलीटी अन्ड रीहाबिलीटेशन  या संस्थेकडून ‘मॅन ऑफ दि इयर’ हा किताब देण्यात आला होता.
त्यांच्या जीवनावर आधारित "थेअरी ऑफ एव्हरीथिंग " हा चित्रपट लोकप्रिय  आहे. त्याना खाजगी आयुष्यात देखील अनेक उतार चढाव  बघावे लागले. त्याची पहिली पत्नी  जेन आणि स्टीफन यांना तीन मुलं झाली. २५ वर्षं संसार केल्यानंतर दोघे  वेगळी झाली. त्यानंतर हॉकिंग यांनी त्यांची नर्स एलियन मेसनसोबत लग्न केलं.   ११ वर्षं नंतर ते देखील वेगळे झाले.
जेवढे त्यांचे शरीर कमजोर होत होते तेवढा त्यांचा मेंदू सशक्त होत होता. त्यांनी जे अफाट संशोधन केले त्यासाठी त्यांनी जणू  मृत्यलाच  ५५ वर्ष थोपवून   ठेवले हॊते. दिवसेंदिवस शरीर तर झिजत होते पण त्यांचे मन मात्र नवनिर्मितीच्याविश्वाच्या मांडणीची उकल करण्याच्या  ध्यासाने झपाटलेले होते. अशा या वादळाचे शरीर आज निर्जीव झाले असले तरी त्यांच्या या कामातून प्रेरणा घेऊन उद्या नवनवीन संशोधक तयार होतील. 

सुधीर वि. देशमुख
अमरावती
१४/०३/१८
Image result for stephen hawking marathiThursday, 7 September 2017

प्रिय आशाताईस

प्रिय, आशाताई
आज तुझा  84 वा वाढदिवस उत्साह काय असते हे तुझ्याकडून शिकावे. आज तू 84 वर्षाची झालीस परंतु तुझे  चैतन्य लखलखित आहे. "मली मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे" हे गीत ऐकताना कोणी तरी रूपगर्विता खरोखरोच ही तरुण्याची कोमल रेशमी शाल अंगावर घेवून एकणाऱ्याच्या कालिजा खल्लास करत आहे असे वाटते. किती गावं आणि कसं गावं हे तुझ्याकडूनच शिकावे. इंडस्ट्रीत लतादीदीचे नाणं खनखणित असतांना तू तुझे वेगळेपण सिद्ध केलेस. आजी,मावशी,काकू सारख्या संज्ञा तुझ्या करीता नाहीच, तु फक्त आशाताई. "उरले उरात काही आवाज चांदन्याचे", खरच तुज्या स्वर्गीय आवाजाचे चांदन्याचे शिंपन निरंतर सुरुच आहे. तुझा आवाज कायमच आमच्या काळजाचा ठोका चुकवनार आहे. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ही ओळ भटांनी तुझ्याच साठी लिहली असावी. आता तुझे हे नक्षत्राचे देने तमाम रसिकांचे झालेले आहे. सख्या रे अनुदिन चीज नवीन गात गात तुझ्या स्वरांची बिन नाविन्याने झंकारत आहे. तुझ्या विषयी काय लिहावे ? स्वर्गातून उतरलेली परीच तू, जोपर्यन्त ईथे गाणे आहे तो पर्यन्त तुझे नाव कायम रसिकांच्या मनात टिकून राहनार आहे. तुझ्या 60 व्या वाढदिवसाला कवि सुरेश भट यांनी लीहलेली ही कविता आजही तुझ्या स्वभावला पूर्ण न्याय देवु शकते ती कविता आज शेयर करत आहे. तुझ्या आवाजाचा ऋतु सतत हिरवाच राहो या तुझ्यासाठी परमेश्वरास प्राथनेसह.तुझ्या  एक ऋणी
सुधीर देशमुख
08/09/17

माझी साहित्यगिरी

लिखाणाची आवड मला फार म्हणजे फारच पूर्वी पासून आहे. काही लोकं याला कुत्सितपणे खोड म्हणतात.(पण लिखाण हे माझ्या खोडात नसून मुळातच आहे.) माझ्य...