Sunday, 27 October 2024

दे रे हरी.....

मागे एकदा मी आमच्या शहरातील आळशी लोकांची बैठक बोलावली होती.  सभेला एकही आळशी आला नाही. सभेला एकही आळशी नसल्यामुळे मलाच स्वतःला सभा घ्यावी लागली. सभेत आळशी लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी एखादी अखिल भारतीय स्तरावरची संघटना असावी असे ठरले. मी स्वतःचे नाव सुचवले व मीच   संस्थापक अध्यक्ष झालो. नंतर वेगवेगळ्या पदासाठी लोक शोधावे असे ठरले, परंतु आळशी समुहाकडून एकाचाही अर्ज आला नाही. आळशी मनुष्य निरूपयोगी असतात, मान्य आहे परंतु ते निरुपद्रवी सुद्धा असतात, हे कोणी समजून घेत नाही. ते कुठल्या मोर्चात जात नाही, कोणावर दगड फेकत नाही. बेड आळशी लोकांचा  फार आवडता असतो. काही शरीर धर्माची कामे बेडवरून खाली उतरल्या शिवाय होत नाहीत, नाहीतर आळशी माणूस कधी बेडच्या खाली आलाच नसता. एकदा आळशी लोकांचा सत्कार घेऊन, 'आळशी शिरोमणी' 'आळशीरत्न' , 'आळशीभूषण' इत्याद्दी पुरस्कार देण्याचे माझ्या अ. भा. आळशी संघटनेने ठरवले पण आळशी लोकांकडून एकही अर्ज आला नाही. कुठल्या पुरस्काराच्या मागे लागणे, त्या साठी सेटिंग करणे. मोठमोठी फाईल करून इकडे तिकडे फिरवणे, आळशी माणसाला पटत नाही. जग आहे तसेच ठेवण्यात आळशी माणसाचा विश्वास असतो. निसर्गाला  कुठलाही धक्का न देता जगत  राहणे, हे आळशी माणसाचे, जगण्याचे शुद्ध तत्वज्ञान असते. मुळात आळशी माणूस कुठल्याच तत्वज्ञानाला मानत नाही, त्यामुळे त्याचे कोणाशीच मतभेद होत नाही. "दे रे हरी खाटल्यावरी" हे एवढंच तत्वज्ञान, आळशी संप्रदायाचे ब्रीद वाक्य आहे. आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो किंवा मी अमुक, मी तमुक असली, कुठकीही शेखी आळशी माणूस मिरवत नाही. म्हणजे आळशी माणसाला कुठलाच अहंकार चिपकत नाही. त्यामुळे तो भगवंताच्या जास्त जवळचा असतो. भगवंत आळशी माणसाच्या सोयीसाठी कुठल्यातरी चिंतातूर माणसाची सोय लावतो, त्यामुळे प्रत्येक आळशीच्या अवती भवती असा एक तरी काळजीवाहू जीव असतो. आळशी माणसाला त्याची काही फिकीर नसते. तो कशाचीच फिकीर करत नसल्यामुळे त्याला उच्च रक्तदाब होत नाही, किंवा मानसिक ताण येत नाही त्यामुळे त्याचा औषधीवर खर्च होत नाही. तो काहीच व्यायाम करत नाही तरी त्याचे आरोग्य धोक्यात येत नाही. कथित मोटिव्हेशनल गुरू सोडले, तर आळशी व्यक्ती कोणाचाही राग करत नाही. आळशी माणूस पुरस्काराच्या मागे धावत नाही, तसाच कुठल्याही सरकारी योजनेच्या मागे लागत नाही. वाटेल ते कागद गोळा करून सरकारी लाभ उपसने त्याला जमत नाही. म्हणजेच तो स्वार्थाच्यापलीकडे गेला असतो. म्हणजेच काय  अपरिग्रह, निस्वार्थ, भावनेने तो बापडा जगत असतो. अन्याय, हक्क, कोर्ट कचेरी असल्या बाबी आळशी माणसाच्या शब्दकोशात नसतात. त्याला कशाचीही चीड येत नाही, की तो कधी संतापत नाही त्यामुळे आळशी माणसाच्या घरी कमालीची शांतता असते. जग कर्तृत्ववान माणसाच्या मुळे चालतं हे जरी खरे असले तरी आळशी माणसांमुळे ते संतुलित आहे, हे कोणीही विसरू नये. आळशी माणूस आत्मचरित्र लिहायच्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे त्याच्या कडून कागदाची बचत होते, व पर्यावरण हानी टळते. आळशी माणसाला कुठलीही महत्वकांक्षा नसते. भांडण, तंटे, वाद, युद्ध ह्या पासून आळशी माणसाच बिस्तरा कोसो दूर असतो. जर जगात बहुसंख्य आळशी झाले तर जग शांततेकडे आपसूकच जाईल. जागतिक शांततेचे एखादे नोबेल प्रातिनिधिक स्वरूपात आळशी माणसाला द्यायला हवे, पण तो बिचारा कधीच तशी मागणी करणार नाही. काही मागणे व त्यामागे धावणे त्याला जमत नाही. आळशी माणसावर कौतुकास्पर लिहण्यासारखे खूप आहे, पण आता आळसामुळे तूर्तास थांबतो. 
 
सुधीर वि देशमुख
संस्थापक अध्यक्ष (स्वयंघोषित) अ. भा. आळशी संघटना.
अमरावती
२७/१०/२४

दे रे हरी.....

मागे एकदा मी आमच्या शहरातील आळशी लोकांची बैठक बोलावली होती.  सभेला एकही आळशी आला नाही. सभेला एकही आळशी नसल्यामुळे मलाच स्वतःला सभा घ्यावी ला...