Saturday, 11 May 2024

मंगल गाणी मंजुळ गाणी ?


©सुधीर वि. देशमुख

"बाकी काय तुमचं काय ठरवायचं ते ठरवा पण लग्नात संगीत संच मात्र अजिबात ठेवू नका!" मुलाच्या मावसाजीने निक्षून सांगितलं. लग्नाची शेवटची बोलणी चालू होती. चहा पोहेच्या दोन तीन फेरी झाल्या होत्या. दोन्हीकडच्या पसंती झाल्या होत्या. अलीकडे बैठकीत तशी फारशी ओढाताण होत नाही.म्हणजे हुंडा वैगरे  कोणी थेट मागत नाही. फार तर तुमच्या मुलीला तुम्ही सांभाळून घ्या आणि मुलाला आम्ही. आता काही पुर्वी सारखी मुलं मुली नसतात. आटोपशीर कुटुंब असतात. त्यामुळे मुलीला व्यवस्थितच सांभाळतील हे माहीत असते. म्हणजे काय तर लग्नाच्या बैठकीत फारशी ओढाताण होत नाही . तर मरफीचा रेडीओ किंवा HMT च्या घड्याळासाठी लग्न तोडण्याचे दिवस केव्हाच गेले.  बैठकीतील मुलाचे मावसाजी लग्नात कुठल्याही प्रकारची गाणी म्हणणारी नको यावर ठाम होते. माझ्या सारख्या संगीतावर प्रेम करणाऱ्या माणसाला खरं तर ही गोष्ट पटणारी नव्हती. लग्नातल्या उपस्थित मंडळींच्या सहनशीलतेचा अंदाज घेत  अश्या लग्नातल्या संगीत कार्यक्रमात मी अनेक वेळा गाणी गायली आहे किंवा ठोकलेली आहे म्हणा. तर मावसाजी फारच अरसिक असावेत असा मी अंदाज केला. मी मनाचा हिय्या करून विचारले, " का हो तुम्ही (आम्हा) गाणं म्हणणाऱ्या   मंडळींच्या जीवावर उठलात." ( कंसातला आम्हा मनातल्या मनात होता, हे समजदार वाचकांना सांगायची गरज नाही.) "काय करावं एवढा मोठा आवाज असतो गाण्याचा की लग्नात कोण काय बोलतो काही कळत नाही." मावसाजी आपली बाजू मांडत होते. मी एकदा असच एका ठिकाणी गाणं  गाऊन उपस्थित पाहुण्यांचा सोशिकतेची परीक्षा घेत होतो. मला ईतर इन्स्ट्रुमेंटचा आवाज जास्त वाटला, मी साऊंड सांभाळणार्याला म्हटलं भाऊ इतर वाद्यांचा आवाज जरा कमी करा, त्याने माझा कडे पाहिले, याच्यात एवढा आत्मविश्वास कुठून आला ? असली त्याची नजर होती. मी परत फिरलो. आल्या संधीचे सोने, माफ करा, गाणे करून मोकळा झालो. म्हणजे काय तर मावसाजीचा मुद्दा खरंच होता की. संगीत आनंददायी न होता त्रास दायक होते तर. साऊंडचा खूप मोठा आवाज त्यामुळे. लोकांना परस्परांशी आजिबात बोलता येत नाही. अलीकडे  अनेक तार्किक अतार्किक कारणांनी लग्न फार उशिरा लागतात. पाहुणे पहिलेच वैतागलेले असतात आणि मग या मोठया आवाजातील गाणी त्यांना इतरांसोबत काही संवाद साधू देत नाही.   मावसाजींची मागणी काही फारशी अतर्क्य नव्हती. सुदैवाने मुली कडची मंडळी काही माझ्या सारखी 'कथित' संगीत प्रेमी नव्हती.  त्यांनी संगीतवाले लग्नात अजिबात ठेवणार नाही, एवढंच काय तर तर तुम्ही म्हणत असला तर मंगलाष्टके सुद्धा अजिबात चालीत न म्हणता वाचून घेऊ पर्यंत मजल मारली. नाही नाही मंगलाष्टके चालीतच झाली व लग्न निर्विग्न पार पडलं. मला आजही वाटते गाण्याचा आवाज मार्यदित ठेवून संगीताचा आनंद सर्वांना घेता आला तर मंगल गाणी कर्णकर्कश न व्होता मंजुळ गाणी होतील.

अमरावती
१२/०५/२४

दे रे हरी.....

मागे एकदा मी आमच्या शहरातील आळशी लोकांची बैठक बोलावली होती.  सभेला एकही आळशी आला नाही. सभेला एकही आळशी नसल्यामुळे मलाच स्वतःला सभा घ्यावी ला...