Saturday 26 September 2020

'तोचि पुरुष भाग्यचा' 

गांधीजींच्या यशा मागचं एक महत्वाचं कारण सांगीतल्या जाते ते म्हणजे ते युवकांना रचनात्मक कार्यक्रम द्यायचे. एक कार्यक्रम संपला की त्यांची पुढीची दिशा व त्यासाठी करावयाच्या कृतींचा आराखडा तयार असायचा. त्यांच्या समर्थकांना ते सतत गुंतून ठेवायचे. सोबत स्वतःची व इतरांच्या मनाची मशागत विविध मार्गाने सुरूच असायची . हे झाले सार्वजनिक जीवणाबाबत. वैयक्तिक जीवनात देखील असंच असू शकतं का ? स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी देखील असा दीर्घ पल्ल्याचा किंवा लघु पल्याचा आराखडा तयार असणे आवश्यक आहे का? आपण रोज सकाळी उठतो, सर्वच उठतात, अर्थात आयुष्य एका दिवसाने वाढले असेल तर. सकाळी जाग आल्यावर  एवढया मोठया दिवसाचं आता मी काय करू, हा प्रश्न ज्या व्यक्तीच्या समोर निर्माण होतो तो माझ्या दृष्टीने दुर्दैवी व्यक्ती, तो मग कितीही धनवान असला तरी. मिळालेल्या वेळचं मी काय करू, हा प्रश्न जिथे निर्माण होतो तिथं उदासपणाचा, खिन्नतेचा जन्म होतो. मनुष्य सदा कदा आनंदी राहू शकत नाही हे जरी खरे असले तरी ज्याच्या कडे वैयक्तिक कामाची यादी नाही, तो जीवनाला लवकर कंटाळु शकतो. खूप मोठे धेय्यच असले पाहिजे असं नाही. आपण सर्वांनीच काहीतरी भव्य दिव्य केलं पाहिजे असंही नाही. नवनवीन चांगलं करत राहण्याची, नवनवीन अनुभव घेण्याची हौस माणसाला जगवतं ठेवत असते. कुठलेही श्रम न करता पदरात प्राप्त झालेल्या क्षणाचा उपयोग जो घेऊ शकतो तोच काही तरी  निर्माण करू शकतो. थोडक्यात काय तर मनाची गुंतवणूक आवश्यक आहे.  कुठलंही रचनात्मक/विधायक काम करत असताना वेळ कसा निघून गेला हे ज्याला कळत नाही, त्याचे आयुष्यही असेच हसतखेळत निघून जाते. एखादं चित्र काढतांना, काही तरी चांगलं वाचतांना, बागकाम करतांना, घर स्वच्छ करतांना, चांगलं गाणं ऐकतांना, बाळाचे स्नान करून देतांना, पाळीव प्राण्याची काही सेवा करतांना (यादीत खूप काही मिळवता येईल ) मिळणारा आनंद,  विकार रहित असतो.  छोट्या छोट्या कामाची का असेना पण काहीतरी योग्य कृतींची यादी असणे आवश्यक आहे,  नाही तर आयुष्य ओझं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच वैयक्तिक आयुष्यात, सकाळी उठल्यावर दिवसभर गुंतवून घेण्यासाठी ज्याच्या कडे  कार्यक्रम आहे,  'तोचि पुरुष भाग्यचा'.

©सुधीर वि. देशमुख
अमरावती
२७/०९/२०

No comments:

Post a Comment

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...