Friday 28 August 2020

डावखुरा

 डावखुरा हा जन्मतःच डावा असतो त्यासाठी खरतर वेगळं काही करावं लागतं नाही. फार सोपं असत डावखुरा होणं, पण डावखुरा होऊन जगणं मात्र तेवढंच कठीण. शाळेत एका डेस्क बेंचवर तीन मुलं बसायची शेजारच्या मुलाचा हात सतत लागायचा त्यामुळे लिहण्यास सतत त्रास होत होता. हॉकी खेळायला गेलो तर हॉकी उजव्या बाजूने खेळता येईल अशी डिजाईन केलेली, कात्री वापरायला गेलो तर परत तीच समस्या. क्रिकेट खेळतांना मात्र जरा भाव मिळायचा. आपल्याकडे डाव्या हाताला विशेष कामासाठी न वापरण्याची परंपरा आहे, प्रसाद घेण्यासाठी डावा हात समोर केला तर लगेच हटकतात. एकीकडे टाळी एका हाताने वाजत नाही म्हणायचं आणि दुसरीकडे डाव्या लोकांना सावत्र वागणूक. मी जवळजवळ सातव्या वर्गात पोहचे पर्यंत डाव्या हातानेच जेवण करायचो नंतर पंगतीत जेवतांना फार त्रास होत होता विशेषतः ग्रामीण भागात. हळूहळू काही ठराविक कामे उजव्या हाताने व काही कामे डाव्या हाताने करायची सवय केली. पुढे डाव्या लोकांची खूप मोठी संख्या आहे कळलं, एवढंच नाहितर डावे लोकं सर्जनशील वैगरे असतात असेही कळलं, खरं खोटं देव जाणे. एखादा आयुष्यभर पंचर जोडणारा, दरिद्रीत जीवन जगणारा, व्यक्ती ज्यावेळी बरकत होणार नाहीच्या भीतीने डाव्या हाताने पैसे घेत नाही त्यावेळी मात्र फार वाईट वाटतं, मग हटकून त्यांना उजव्या हाताने पैसे दयावे लागतात. आयुष्यभर असा बरकतचा नियम पाडणारा हा अजूनही एवढा दारिद्री कसा? हा विचार मनाला भेडसावत राहतो. आज जागतिक डावखुरा दिवस आहे म्हणतात, आपलाही एक दिवस येईल 😜असं वाटलं नव्हतं. तर जागतिक डावखुऱ्या दिवसाच्या माझ्या सारख्या डाव्या (हाताने )लोकांना हार्दिक शुभेच्छा.

डावखुरा
सुधीर वि.देशमुख
१३/०८/२०

No comments:

Post a Comment

मंगल गाणी मंजुळ गाणी ?

©सुधीर वि. देशमुख "बाकी काय तुमचं काय ठरवायचं ते ठरवा पण लग्नात संगीत संच मात्र अजिबात ठेवू नका!" मुलाच्या मावसाजीने न...