Monday 7 August 2017

आठवणीतला श्रावण


श्रावण सुरु झाला कि एक नवीन चैतन्य सृष्टीत निर्माण होते.  आषाढ एकादशी साठी आपल्या विठुरायाच्या दर्शनाला गेलेला शेतकरी परतलेला असतो. शेतात पेरणी झालेली असते. सृजनासाठी धर्तीच्या कुशीत बियाणे शांत झोपी गेलेले असते. आषाढ मेघ आपल्या सरींच्या द्वारे जमिनीवर भेटीसाठी उतरतात. धरती तशीच ग्रीष्माच्या तापाने तापलेलेली असते. ती या मिलनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते. धर्तीच्या व वर्षा धारेच्या या मिलनातून, धरतीच्या पोटात पडून असलेले बियाणं अंकुरते, जमिनीच्या एक एक आवरणाला विभागत   हलकेच बाहेर डोकावू लागते. त्या कोवळ्या अंकुराला रवी किरणाने स्वतः;ला न्हाऊ घालायचे असते. हळूहळू सर्व जमीन जणू हिरवी शाल आपल्या अंगावर ओढून घेते. पावसाच्या मिलनाने ती पार शहारलेली असते, मोहरलेली असते. हिरवा शालू पांघरून आपले अंग अंग लपवू पाहणार्या धरतीच्या  फुलपाखरू खोड्या करू पाहते. या झाडावरून त्या झाडावर या फुलावरून त्या फुलावर उडत राहणार्या फुलपाखरा सोबत पक्षी देखील आपले सूर मिळवत सामील होतात. 
असे हे सृष्टीचे देखणे रूप घेऊन श्रावण दाखल होतो. श्रावण सर्व प्राणीमात्रावर आपल्या प्रसन्नतेची फुंकर घालतो. वातावरण निर्मळ  व देखणे करत आपल्या थेट हृदयात शिरतो. निसर्गच्या सोबतच धार्मिक उत्सवांची उधळण करणारा हा महिना.  एकापेक्षा एक अश्या उत्साहवर्धक ऊत्सवांमुळे  महिला व लहान मुलांच्या विशेष जवळचा आहे. श्रावणातला  सोमवार सर्वसाधारण सोमवार नसून "श्रावणी सोमवार" असतो, शिवभक्तीचा हा दिवस. पूर्वी शाळा, म्हणजे  आंतरराष्ट्रीय होण्या पूर्वी   अर्ध्या दिवसाची असायची (ग्रामीण भागात अजूनही राहते) त्यामुळॆ मला श्रावण सोमवारचे विशेष आकर्षण असायचे. नागपंचमी,मंगळागौर, राखीपौर्णिमा,गोपाळकाला  व शेवटी पोळा असे एक एक सण म्हणजे आनंदाची मेजवानी. नागपंचमीला आम्ही नागाचे वारूळ शोधून त्याची पूजा करयायचो अर्थात खाली वारुळाची. एरवी साप  दिसला की त्याच्या मागे धावणारे या दिवशी मात्र त्याची पूजा करण्यासाठी दुधाची वाटी घेऊन फिरत. कधी कधी एखादा गारुडी साप घेऊन यायचा त्याच्या दुधासाठी पॆसे गोळा करायचा. दुधाची गरज सापाला  नसून गारुड्याच्या कुटुंबाला आहे हे कळायच ते वय नव्हतं. जे दिसे त्यावर पटकन विश्वास बसायचा. 
रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा सण, दुसर्या दिवशी शाळेत जाऊन राखी दाखवत हात मिरवण्याची विशेष गम्मत वाटायची. राखी हल्ली वेगवेगळया प्रकारच्या पाहायला मिळतात आम्हच्या लहानपणी  राखी स्पन्ज पासून बनवलेल्या असायच्या. कालांतराने ह्याच स्पन्जचा उपयोग पाटी पुसण्यासाठी होत असे.. राखीच्या दिवशी भावांपेक्षा बहीणीचिच मिळकत जास्त राहत होती त्यामुळे मला माझ्या बहिणीचा हेवा वाटायचा. दहीहंडीचे प्रकार त्याकाळी लहान गावी फारसे होत नसे. त्याला उत्सवाचेच स्वरूप होते, त्याचे बाजारीकरण झाले नव्हते.  
पोळा मात्र मला तुलनेने जास्त आवडायचा तान्हया पोळा आला की मातीचा नाहीतर लाकडी बैल   घेऊन फिरलो कि भरपूर मिळकत ह्यायची. त्याकाळी पॉकेट मनी सारखा प्रकार आम्हच्या घरापर्यंत पोहचला नव्हता. त्यामुळे खिसा  हा  चिंचा, बोरं, कैरी, कंचे ,गारा इत्यादी ऐवज ठेवण्यासाठीच असतात असा आम्हचा समज होता. म्हणून पोळ्याच्या दिवशी झालेल्या या कमाईचे फार कौतुक होते. पतंग, कांचे पासून ते शाळेच्या गेट समोर बसणार्या आजीजवळून मधल्या सुटीत विविध खाद्य सामुग्री घेण्यात हे धन कामात यायचे. इतर वेळी मात्र घरी येणाऱ्या पाहुण्यावर भिस्त राहायची. पाहुणा आल्यावर उठून कधी जातात व जाता जाता हातावर रुपया कधी ठेवतात यासाठी त्यांच्या  अवती भोवती रेंगाळण्यात बराच वेळ जात असे. शेतकरी या दिवशी आपल्या बैलांची पूजा करतो त्यांना गावात फिरवतो. निसर्गाच्या जवळ नेत प्राण्यांवर प्रेम करायला शिकवणारा हा महिना. आजही एखादी श्रावण सर पाठोपाठ कोवळे ऊन घेऊन येते, सोबतिला  येणारा  शीतल वारा अंगावरून मायेने हात फिरवतो व आठवणींच्या या मोहक दुनियेत बोट धरून फिरवून आणतो.  

सुधीर वि. देशमुख 
अमरावती 
०७/०८/१७

No comments:

Post a Comment

मंगल गाणी मंजुळ गाणी ?

©सुधीर वि. देशमुख "बाकी काय तुमचं काय ठरवायचं ते ठरवा पण लग्नात संगीत संच मात्र अजिबात ठेवू नका!" मुलाच्या मावसाजीने न...