Sunday 13 August 2017

खरेदी एक भोग !

खरेदी एक भोग !
जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला खरेदी करावी लागते. ज्याने आयुष्यात कधीच खरेदी केली नाही असा व्यक्ती कदाचितच असेल. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जश्या मुलभूत गरजा होत तशीच खरेदी सुद्धा मुलभूत गरज आहे. किंबहुना खरेदी मुळेच ह्या गरजा भागू शकतात. मानवी उत्कांतीचा इतिहास हा खरेदीचाच इतिहास आहेे. खरेदी प्रकियेत ग्राहक व विक्रेता हे दोन मुलभूत घटक जसे अंतर्भूत असतात तसेच ईतर अनेक घटक देखील यामधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अंतर्भूत होत असतात. आजच्या काळात माणूस हा माणूस आहे का नाही हे खात्रीलायक रीत्या सांगणे धाडसाचेच होईल. पण माणूस हा ग्राहक मात्र आहे.  हा ग्राहक राजा आहे का नाही हा मात्र संशोधनाचाच विषय आहे. या ग्राहकावर कशी सर्व विक्रेत्यांची शोधक नजर असते हे सर्वांनाच माहित आहे.
दुकानदार होणे हि फार मोठी कला आहे. जसे जातिवंत कलाकार जन्म घेत असतात तसेच सच्चा दुकानदार सुध्दा जन्माला यावा लागतो . जोतिष्यकार मानसशास्त्र जाणतो तसेच दुकानदार सुद्धा मानसशास्त्राचा जाणता असणे आवश्यक आहे. सच्चा दूकानदार सुरवातीला या साहेब, या मँडम म्हणत हळूहळू माणसाच्या हृदयात शिरतो आणि तेथून हळूच आपल्या खिशात शिरुन त्याला कात्री कशी लावतो हे कळू देत नाही. विक्रेय कलेला चौसष्ट कलेत स्थान आहे का नाही मला माहित नाही, पण ती एक फार मोठी कला आहे हे मान्यच करावे लागेल. एखाद्या वस्तूचा भाव विचारल्यावर “आपके लिये दाम क्या चीज है !” पासून सुरु झालेला हा प्रवास पुढे पुढे एका निर्णायक टप्यावर दुकानदार अलगद नेवून ठेवतो. दुकानदाराने “औरो के लिये पचास रुपये लेकीन आप बस चालीस हि देना ! असे म्हटले कि आपली छाती एक दोन इंचाने वाढते व जिथे एक वस्तू घ्यायाची आहे तिथे दोन तिन घेतल्या जातात. दुकानदार आपल्यालाच का स्वस्त विकतो ? एक दोन नव्हे तर अनेक दुकानदार मला ‘बस आपके लिये ये कम भाव है!’ असे म्हणू लागले तेव्हा आपण यांचे कोण विशेष ? हे आपल्याला कमी भावात वस्तू कसे  देतात? असले प्रश्न सतावू लागले खरे तर दुकानात आलेल्या बहुतेक ग्राहकांना असे म्हणतच  पटवल्या जाते हे मला काही वर्षांनी कळले.
साडीच्या दुकानातला विक्रेता तर प्रचंड संयमी असतो एखाद्या संताला शोभावे एवढे शांत मन यांना ठेवावे लागते. ग्राहकाला नेमकी कुठली साडी पसंत येवू शकते याचा नेमका अंदाज घेत त्याला तिमिरातून तेजाकडे प्रवास करत जावे लागते. नेमका कुठला रंग व कुठला पँटर्न पसंत येवू शकेल हे खुद ग्राहाकाला ही माहित नसल्यामुळे त्याला एक एक पायरी चढत-चढत हा जटील प्रवास कराचा असतो. शेवटी ग्राहकाला पसंत येतच नाही म्हटल्यावर “तो हळूच आपके रेंज में बस येही मिल सकता हैं “ असे म्हणत थेट ग्राहकाच्या स्वाभिमानाला हात लावतो. ( रेंज हा फार गमतिशीर प्रकार आहे आपल्याला पसंत येणारी वस्तू बहुतेक आपल्या रेंज मधे नसतेच शिवाय आपली रेंज आपल्या पेक्षा विक्रेता ठरवतो.) “साहब क्या नहीं बोलने वाले है क्या ?” लगेच दुसरी फुसकी सोबतच्या व्यक्तीकड़े पाहत सोडण्यात येते. सोबत आलेला प्राणी जो बहुतेक लहान मुल, बँग व शेवटी बिल देण्याच्या शिल्लक कामासाठी आलेला असतो मुकाट्याने हे सर्व बघत असतो. (सोबत असलेल्या या मूक प्राण्याला मराठीत नवरा असे म्हणतात हे सुज्ञ वाचकांना संगाण्याची गरज नाहीच) अनुभवातून तो हे शांत बसुन राहणे शिकलेला असतो, त्याचे हे शांत बसने गृहीत धरल्या जाते व तो चतुर विक्रेता लगेच वरच्या भावाच्या साडीचे डब्बे आणून टाकतो. अश्या पद्धतीने हळहळू रेंज वाढत जाते. नंतर “ ये माल कलही आया है !” अशी पुस्ती जोडन्यात येते समोरच्या ग्राहकाला खास ठेवनितला माल दाखवत आहे असे पटवून देण्यात येते. वर "ये सिर्फ हम हमेशा के ग्राहक को ही  दिखाते है!"अशी शेपटी जोडण्यात येते. हमेशा का ग्राहक होण्यासाठीची अट काय असते हे त्या दूकानदार लोकांनाच माहीत. एकदा  मी एका लग्नासाठी भेट वस्तु घेण्यासाठी दुकानात गेलो असता "आप क्या हमारे हमेशा के ग्राहक इसलिए ये भाव लगा रहे!", सुरु झाले. खरे तर मी त्या दुकानातच काय त्या शहारत ही प्रथमच गेलो होतो. शेवटी एक साडी पसंत आल्यावर “बस एकही?” असे म्हणत “साहब क्या नही बोल रहे हैं ?” परत सुरु होते अश्या प्रकारे हजार रूपया पर्यंत एका साडी साठी गेलेले दाम्पत्य, पाच  हजाराच्या दोन-तिन साडया घेवुन दुकानाच्या पायऱ्या उतरतो. उतरताना एकाच्या चेहऱ्यावर विजयी भाव असतो तर दूसरा आपला या खरेदी मुळे विस्कटलेली घड़ी जुळवत असतो.
विकत घ्यायच्या हेतूवर वस्तू कुठली दाखवायची हे ठरत असते . एकदा मी अशीच एक वस्तू घेत होतो, “इससे सस्ता नही क्या?” असे दोनचार वेळा विचारून झाले. “शेवटी देणे के लिए होना क्या ?” असे विचारण्यात आले, मी हळूच हो म्हटले. नंतर वेगळ्या गटातली वस्तू मला दाखवण्यात आली. “क्या साहब पहले बोलेनेका ना, देणे के लिये होना !” असा उपदेश त्या वस्तू सोबत मोफत बांधत मी बाहेर पडलो.
मूळ वस्तू सोबत फ्री भेटनार्या किरकोळ वस्तूचे चोखंदळ ग्राहकाला विशेष आकर्षण असते. या फ्री वस्तूंच्या नादात बिनकामाच्या वस्तू घरात येवून कशा ठान मांडतात कळत नाही. मुख्य वस्तूपेक्षा या फ्री मिळणाऱ्या वस्तूंवर नजर ठेवून खरेदी करणे म्हणजे धाकटी वर नजर ठेवून थोरलीशी लग्न  करण्यासारखे आहे.
अलीकडे लहान मोठया शहरात मॉल नावाची बाजार संस्कृती उभी झाली आहे. इथे कोणी पटवून देणारा विक्रेता नसतो परन्तु वस्तूच एवढ्या विशेष पद्धतीने मांडलेल्या असतात कि घेनाराच्या पदरात (ट्रॉलीत) अलगद येवून पडतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतेच पाहुल ठेवलेल्या नवयुवकाला कुठे कुठे पाहावे असे होते, तसेच काहीसे येथे होते. विश्वमित्राची समाधी भंग करासाठी देवाने अप्सरा पाठवली होती, येते तर एक एक वस्तू ग्राहाकाचे चित्त विचलीत करत बसल्या असतात. .शेवटी बिल देणारा हाथ जरी ऐक असला तरी ट्रॉलीत वस्तू टाकणारे हात मात्र अनेक असतात. बिल देतांना या हातामागचे कर्तेधर्ते माहित होते. मग एक एक वस्तू ची कशी गरज आहे हे पटवून दिल्या जाते. एखादी वस्तू बाहेर काढून ठेवावी तर लगेच 'पप्पा ! ' असा लाडीक आग्रह कानावर येते. ही खरेदी घरात नव्यानेच निर्माण झालेल्या ग्राहकाची असते. हल्ली लहान मुल जन्म घेतच नाही, जन्म घेतो तो थेट ग्राहकच. या ग्राहकासाठी नाना वस्तू बाजारात दिमतीला हजर आहेत, फक्त खिसा सैल करण्याची तयारी हवी. स्वयंपाक खोली पासून तर स्नानगृहा पर्यंत च्या एक एक वस्तू एकाच ट्रॉलीत गुण्यागोविंदाने प्रवेश करतात व् हा ग्राहक राजा मोठ्या दिमागात  लांब लचक बिल घेवून बाहेर पडतो. बिलावर शेवटी यू सेव्ड ×× बघून त्याचा चेहरा खुलते. xx वाचवा साठी मात्र बरीच "xxxxx"  चुकवावी लागते.
खरेदीतला दूसरा प्रकार सेल, मोठा गमतीशीर येथे ग्राहक निव्वळ विजयी होण्याच्या भूमिकेतूनच उतरलेला असतो. काहीही घेतले तरी आपला फायदाच फायदा असे त्याच्या डोक्यात जाम बसलेले असते. सेल मधे पसंत आलेला शर्ट बहुतेक आपल्या मापाचा नसतो असलाच तर नेमका मोक्याच्या जागी उसळलेला असतो.
बाकी खरेदीत हल्ली नवनवीन प्रकार रुळ झालेले आहे त्यामधे टेलीशॉपिंग, ऑनलाइन, नेटवर्क मार्केटिंग इत्यादी प्रकार आहेत याविषयी नंतर कधीतरी.

सुधीर वि. देशमुख
अमरावती
रविवार
१३/०८/१७




 

No comments:

Post a Comment

मंगल गाणी मंजुळ गाणी ?

©सुधीर वि. देशमुख "बाकी काय तुमचं काय ठरवायचं ते ठरवा पण लग्नात संगीत संच मात्र अजिबात ठेवू नका!" मुलाच्या मावसाजीने न...